प्रवाशांना लुटणारी रिक्षाचालकांची टोळी जेरबंद; रात्रीच्या वेळी रोख रक्कम आणि ऑनलाइन लूट

रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षाचालकांच्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी रिक्षात बसलेल्या प्रवाशाला धमकावून रोख रक्कम आणि ऑनलाइन पैसे घेतले होते. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि चोरीचा माल असा 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रोहित चव्हाण (वय 23, रा. फुरसुंगी ), संकेत चव्हाण (वय 19, रा. देवाची उरुळी), सुदर्शन कांबळे (वय 22, रा. वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तिघे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. 27 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास स्वारगेट येथून बसलेल्या एका प्रवाशाला तिघांनी लुटले होते. आरोपींनी फिर्यादींना रिक्षात फिरवून लुल्लानगर परिसरात पाचशे रुपये काढून घेतले. तसेच चांदीचे दागिने आणि मोबाईल हिसकावला होता. यानंतर फिर्यादींना कोंढवा परिसरात सोडून आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी गुन्हा दाखल आरोपींचा माग काढला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नाद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, अंमलदार आश्रुबा मोराळे यांच्यासह पथकाने चव्हाणला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले दोन साथीदार मयूर आणि सुदर्शन यांच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तिघांना या गुन्ह्यात अटक केली.

दिडशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले
गुन्हा रात्रीच्या वेळी घडल्यामुळे सुरुवातीला काही माहिती मिळून येत नव्हती. यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्याचा छडा लावला.