भीक मागण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या महिलेला अटक; 35 लाखांचे दागिने जप्त

भीक मागण्याच्या बहाण्याने उघड्या दरवाजावाटे घरात शिरून सोने व रोख रक्कम चोरणाऱ्या महिलेला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 35 लाखांचे 52 तोळे सोन्याचे दागिने, 26 हजारांची रोकड, साडेपाच लाखांची मोटार असा मिळून 40 लाख 76 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. मिली दीपक पवार (वय 20, रा. आडगाव नाका, झोपडपट्टी, पंचवटी, नाशिक) असे अटक
केलेल्या महिलेचे नाव आहे.

चंदननगर परिसरात घरात शिरून दागिन्यांसह ऐवजाची चोरीच्या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यावेळी पोलीस हवालदार महेश नाणेकर यांना चोरी करणारे आळंदी देवाची परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणाहून मिली पवार हिच्यासह अल्पवयीनाला ताब्यात घेतले. ही कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक अनिल माने, एपीआय सिद्धनाथ खांडेकर, महेश नाणेकर, सचिन रणदिवे यांनी केली.

भिक्षेचा बहाणा अन् ऐवजावर डल्ला
मिली पवार ही अल्पवयीन मुलासह भीक मागण्याचा बहाणा करीत होती. त्यानंतर एखादे घर उघडे दिसल्यास आतमध्ये शिरून चोरी करीत होती. अवघ्या काही मिनिटांत कपाटातील दागदागिने, रोकड चोरून पसार होत होती. तिच्याकडून चंदनगरमधील घरातून 52 तोळे सोन्याचे दागिने चोरीची रक्कम जप्त केली.