पुणे शहरासह जिल्ह्यात चोरटे सुसाट; ऐन नवरात्रात मंदिरातील आभुषणे, दानपेट्यांवर डल्ला

ऐन नवरात्रोत्सवाच्या कालावधीत शहरासह जिल्ह्यात चोरटे सुसाट सुटले असून, मंदिरातील दोनपेट्या, आभुषणांवर डल्ला मारून लाखोंचा मुद्देमाल लांबविला जात आहे. दोन दिवसांपूर्वीच शहरातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिरात शिरून चोरट्याने रोकड लांबविली, तर इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावाच्या हद्दीतील विरवाडी येथील श्री जावलसिद्धनाथ मंदिरात चोरीची घटना घडली. नवस बोलायचा आहे, असे सांगून चोरटा पुजाऱ्याच्या कुटुंबीयांना खोटे बोलून मंदिराची चावी घेऊन गेला. त्यानंतर त्याने 70 हजार रुपयांची चोरी करून पोबारा केल्याचे समोर आले आहे.

याबाबत अभिमन्यू पर्वती बंडगर यांनी भिगवण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार भिगवण पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या वेळी लाल शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला 55 वर्षांचा व्यक्ती बंडगर यांच्या आई मताबाई बंडगर यांच्याकडे आला. आपल्याला नवस बोलायचा आहे, तेव्हा चावी द्या असे म्हणून त्याने विश्वास संपादन करून चावी नेली. त्यावेळी अभिमन्यू बंडगर हे रविवारचा बाजारचा दिवस असल्याने बाहेर गेले होते. रात्री आठ वाजता देवाची आरती करण्यासाठी जेव्हा सगळेजण ज्यावलसिद्धनाथ मंदिरात गेले, त्यावेळी देवाच्या मंदिरातील चांदीचे आभुषणे व सोन्याचे दागिने दिसले नाहीत, तेव्हा संबंधित चोरट्याने चोरी केल्याचे समोर आले. चोरट्याने साडेतीनशे ग्रॅमची चांदीची छत्री, चांदीची चिलीम, चांदीची चैन, देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व दहा हजार रुपयांची रोख रक्कम असा 70 हजार रुपयांचा ऐवज या चोरट्यांनी चोरून नेला. भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आहे नारायनात मंदिरातील्ला निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय लोडी पुढील तपास करीत आहेत.

शहरात घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत चोरट्याने प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून गाभाऱ्यातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरटा चेहरा झाकून घेतला असल्याने त्याची ओळख पटू शकली नाही.

याबाबत कौस्तुभ उल्हास गाडे (वय 40, रा. शनिवार पेठ) यांनी
विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओंकारेश्वर मंदिर हे पेशवेकालीन मंदिर आहे. ओंकारेश्वर मंदिराला दोन प्रमुख दारे आहेत. त्यातील नदीकाठी असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटा आत शिरला. त्यानंतर त्याने गाभाऱ्यात प्रवेश केला. तेथील दान पेटीचे कुलूप तोडून त्यातील सुमारे 6 हजार रुपये चोरून नेले. सकाळी सहा वाजता मंदिर उघडल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, विश्रामबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.