Haryana election result – भाजपने सत्ता राखली, पण सैनींच्या मंत्रीमंडळातील 8 मंत्र्यांनी पराभवाची चव चाखली

हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीचा मंगळवारी निकाल लागला. हरयाणामध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखली. भाजपला 48, काँग्रेस 37, आयएनएलडी 2 आणि अपक्ष उमेदवार 3 जागांवर निवडून आले. अर्थात भाजपने बहुमत मिळवले असले तरी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या मंत्रीमंडळातील 8 मंत्र्यांनी पराभवाची चव चाखली आहे.

हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या मंत्रीमंडळातील 8 मंत्री पराभूत झाले. कृषीमंत्री कंवरपाल गुर्जर, विकास आणि पंचायत राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) असीम गोयल, आरोग्य मंत्री कमल गुप्ता, अर्थमंत्री जय प्रकाश दलाल, क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संजय सिंग, स्थानिक स्वराज्य संस्था राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) सुभाष सुधा, पाटबंधारे आणि जलसंपदा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अभयसिंग यादव, तसेच माजी मंत्री रणजित चौटाला यांना जनतेने नाकारले. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांना पराभवाचा धक्का बसला.

हरयाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या तीन तासांत हरयाणातील जनतेचा कौल भाजपविरोधी असल्याचे स्पष्ट झाले. ‘एक्झिट पोल’चे अंदाज खरे ठरताना दिसत होते. भाजप सरकारविरुद्ध ‘ऍन्टी इन्कम्बन्सी’ची लाट असल्याचे चित्र होते.मात्र, तीन तासांच्या मतमोजणीनंतर भाजपने आघाडी घेतली आणि निकाल फिरले.

हरयाणात भाजप तर जम्मू – कश्मीरमध्ये इंडिया आघाडी

हरयाणात भाजपने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. 2014च्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या. 2014ला 41 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसलाही 2014 पेक्षा सहा जागा जास्त मिळाल्या. 2014 ला काँग्रेसचे 31 आमदार होते. दुष्यंत चौताला यांच्या जेजेपी पक्षाचा दारूण पराभव झाला. 2014 ला 10 जागा जिंकून भाजपबरोबर जेजेपीने युती केली होती. यावेळी एकही जागा मिळाली नाही. दुष्यंत चौतालाही पराभूत झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)