कोलकाता बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांची सुरक्षा आणि अन्य मागण्यांसाठी कनिष्ठ डॉक्टरांनी उभारलेल्या आंदोलनाला आणि उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आरजी कर कॉलेजच्या 50 वरिष्ठ डॉक्टरांनी आज सामूहिक राजीनामे दिले. उद्या देशभरातील डॉक्टर उपोषण आंदोलन करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज वैद्यकीय महाविद्यालयात अनेक विभाग आणि त्यांच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला.
आरोग्य सचिवांना हटवावे, आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजसाठी एक मध्यवर्ती यंत्रणा असायला हवी. सीसीटीव्ही, ऑन-कॉल रुग्ण आणि वॉशरूमसारख्या सुविधांसाठी टास्क फोर्स बनवायला हवे. कायमस्वरूपी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करणे, रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त झालेली पदे भरणे, विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेणे, कॉलेजच्या रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनला मान्यता मिळणे, बंगाल मेडिकल काऊंसिल आणि आरोग्य भरती बोर्ड यातील भ्रष्टाचाराची तत्काळ चौकशी व्हायला हवी, अशा मागण्या आहेत.
डॉक्टरांना फेमाचाही पाठिंबा
कनिष्ठ डॉक्टरांनी 5 ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आरोग्य सचिव एनएस निगम यांच्या हकालपट्टीसह 9 मागण्यांवर ते ठाम आहेत. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने पश्चिम बंगालच्या कनिष्ठ डॉक्टरांना पाठिंबा जाहीर केला. सर्व डॉक्टर 9 ऑक्टोबर रोजी देशभरात उपोषण करणार असल्याची माहिती फेमाने दिली आहे.
पाचपैकी 3 मागण्या पूर्ण
बलात्कार आणि हत्येच्या घटनेविरोधात ज्युनियर डॉक्टर 10 ऑगस्ट ते 21 सप्टेंबर असे 42 दिवस संपावर गेले होते. डॉक्टरांनी याआधी सरकारसमोर 5 मागण्या मांडल्या होत्या. त्यापैकी 3 मागण्या सरकारने मान्य केल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इतर दोन मागण्या आणि अटींवर विचार करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला. ते कामावर परतले होते. 27 सप्टेंबर रोजी सागर दत्ता रुग्णालयात 3 डॉक्टर आणि 3 परिचारिकांना मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांनी 1 ऑक्टोबरपासून पुन्हा संप सुरू केला होता.