मुंबई-नाशिक हायवेच्या काँक्रीटीकरणाचा बॅण्ड वाजला; रस्ता पूर्ण होण्याआधीच मागे पडले भेगांचे जाळे

मुंबई-नाशिक महामार्गावर ठाणे ते वडपे दरम्यान सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाचा निकृष्ट दर्जामुळे पुरता बॅण्ड वाजला आहे. 2021 मध्ये सुरू झालेले हे काम येत्या फेब्रुवारीमध्ये पूर्ण होणार आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यापूर्वीच या रस्त्याची पुरती दुर्दशा झाली असून 23 किलोमीटरच्या अंतरामध्ये सुमारे 500 मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. काम सुरू असतानाच या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे या मोठमोठ्या भेगांचे जाळे बुजवताना एमएसआरडीसीच्या नाकीनऊ आले आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गावर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी रुंदीकरणाचे काम 2021 मध्ये सुरू करण्यात आले. नवीन रस्ता पूर्णपणे काँक्रीटचा तयार करण्यात येत आहे. अनेक कारणामुळे काम पूर्ण होण्यास कमालीचा विलंब झाला आहे. ठाणे ते वडपे दरम्यान सुमारे 23 किलोमीटरच्या अंतरामध्ये काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील सर्व काम फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र त्यापूर्वी या नव्याने तयार झालेल्या रस्त्याची पुरती दुर्दशा झाली आहे. ठाण्यापासून वडपेपर्यंत या काँक्रीटच्या रस्त्यावर सुमारे 500 मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणच्या भेगांना तर खड्यांचे स्वरूप आल्याने वाहनांचा वेग मंदावला आहे. काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने प्रशासनावर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर एमएसआरडीसी प्रशासनाने या रस्त्याची पाहणी केली, त्यावेळी त्यांना ठाणे ते वडपे दरम्यान मोठ्या प्रमाणात भेगा आढळून आल्या. या भेगा बुजवण्यासाठी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

दुरुस्तीमुळे वाहतुकीला अडथळा
मुंबई-नाशिक महामार्गावर ठाणे ते वडपे दरम्यान पडलेल्या भेगा बुजवण्याचे काम एमएसआरडीसीने सुरू केल्यामुळे वाहनचालकांच्या डोक्याला मोठा ताप झाला आहे. ज्या ठिकाणी भेगा बुजवल्या जातात, तेथील मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागत आहे. त्यामुळे काम सुरू असलेल्या भागात वाहनांचा वेग मंदावत आहे. परिणामी अनेक ठिकाणी वाहनचालकांना आणि प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, रस्त्यावर भेगा कशा पडल्या याची चौकशी एमएसआरडीसीच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.