हॉर्न बनवलेच नाहीत तर काय होईल याचा विचार करा. हॉर्न बनवणेच बंद केल्यास ध्वनी प्रदूषण बरोबर आटोक्यात येईल, असे परखड मत उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. हॉर्नमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. त्याला आटोक्यात आणायचे असल्यास हॉर्नची निर्मितीच थांबवायला हवी, असे खंडपीठाने नमूद केले. ज्या गोष्टी धोकादायक आहेत त्याची निर्मिती थांबवणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक हे पर्यावरणासाठी घातक आहे. माशांच्या पोटात प्लॅस्टिक जमा होते. त्यामुळे प्लॅस्टिकदेखील बनवणे बंद करायला हवे, असा सल्ला खंडपीठाने दिला.
रिक्षाचालकांमध्ये जनजागृती करा!
उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ व अन्य परिसरात रिक्षाच्या हॉर्नमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी रिक्षा चालकांमध्ये जनजागृती करा. वाहतूक पोलिसांनी ही जनजागृती करावी. कारण शहर पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते, असे खंडपीठाने नमूद केले. वाहतूक पोलीस रिक्षा चालकांमध्ये जनजागृती करतील, अशी हमी सरकारी वकील विठ्ठल कोंडे-देशमुख यांनी दिली.
उल्हासनगरसाठी टोल फ्री क्रमांक
मोठ्या आवाजाची तक्रार करण्यासाठी उल्हासनगर येथे खास टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या क्रमांकाची जाहिरात वृत्तपत्रात देण्यात आली आहे. सोशल मीडियावर या क्रमांकाची माहिती देण्यात आली आहे, असे अॅड. विजय पाटील यांनी न्यायालयाला सांगितले.
शाळेतल्या मुलांना धडे द्या
उल्हासनगरमधील शाळेतील मुलांना ध्वनी प्रदूषणाच्या दुष्परिणांमाची माहिती द्या. जेणेकरून ते आईवडिलांना सांगतील की आवाज कमी ठेवत जा. याचिकाकर्त्या सरिता खानचंदानी यांनी शाळेतून ही जनजागृती करावी. पालिका व पोलिसांनी त्यांना मदत करावी, असे न्यायालयाने सांगितले.