शिवसेनेने लाडक्या बहिणीला मिळवून दिला न्याय, सेंट्रल बँकेला शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचा दणका

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या पैशांवर बँकाच डल्ला मारत असल्याचे समोर आले आहे. एका महिलेने या योजनेसाठी सेंट्रल बँकेचे बचत खाते नोंदवले. त्यानुसार 2 ऑक्टोबर रोजी तिच्या खात्यात पैसे आले, परंतु आलेले पैसे शुल्कापोटी बँकेने त्याच दिवशी स्वतःच्या खात्यात वळते केले. याबाबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने बँकेच्या व्यवस्थापकांना जाब विचारल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करत संपूर्ण रक्कम परत करण्याची ग्वाही दिली. शिवसेनेच्या दणक्यानंतर बँक वठणीवर आली.

बँकेने शुल्कापोटी पैसे वळते केल्यानंतर खातेधारक लता गौडा यांनी बँकेच्या व्यवस्थापनाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांना कोणतेच ठोस उत्तर बँकेकडून मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात जाऊन याबाबत सांगितले. त्यानंतर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने सचिव निखिल सावंत यांच्या नेतृत्वात सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक कृष्णकुमार बढाया यांची भेट घेऊन संबंधित प्रकाराबाबत जाब विचारला.

अशाप्रकारे महिलांचे पैसे लाटण्याचा अधिकार बँकांना कुणी दिला, असा प्रश्न शिष्टमंडळाने केला. त्यानंतर झाल्या प्रकाराबाबत बढाया यांनी दिलगिरी व्यक्त करत लता गौडा यांच्या खात्यातून वळती केलेली संपूर्ण रक्कम परत करण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली. तसेच असे पुन्हा घडणार नाही असे आश्वासनही दिले.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने तत्परतेने न्याय मिळवून दिल्याबद्दल गौडा यांनी संपूर्ण शिवसेना पक्षाचे आणि ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. शिष्टमंडळात खजिनदार देविदास माडये, कार्यकारिणी सदस्य बबन सकपाळ, कक्ष विधानसभा संघटक बळीराम मोसमकर, कृष्णकांत शिंदे, कार्यालय चिटणीस सत्यवान फोपे, राजेश चव्हाण, वॉर्ड संघटक संतोष हिनकुल उपस्थित होते.