अपमृत्यूच्या केसचा पंचनामा करत असताना लोकलने अचानक हॉर्न मारल्याने अधिकारी घाबरून नाल्यात पडल्याची घटना बोरिवली येथे घडली. नाल्यात पडल्याने अधिकारी हा जखमी झाला आहे. त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी दुपारी एमएचबी पोलिसांना एक फोन आला. बोरिवली पश्चिम येथील दहिसरच्या दिशेने रेल्वे रुळाखाली वाहणाऱ्या नाल्यावर बांधलेल्या पुलाच्या भिंतीवर एक जण बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्या माहितीनंतर एमएचबी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मुकेश खरात आणि पथक हे सोमवारी घटनास्थळी गेले. घटनास्थळी एक जण मृत अवस्थेत दिसला. त्यामुळे खरात आणि त्याचे पथक हे विविध अँगलने पंचनामा करत होते.
खरात हे रेल्वे रुळाजवळ उभे राहून पंचनामा करत होते. तेव्हा तेथून जाणाऱ्या लोकलने हॉर्न वाजवला. अचानक हॉर्न ऐकून खरात यांना धक्काच बसला. त्यामुळे ते 20 फूट नाल्यात पडले. अपघातात जखमी झालेल्या खरात यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल केले आहे.
ज्या व्यक्तीचा रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळून आला होता. त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे तपासात समोर आले आहे. खरात हे बोरिवली येथे पोलीस वसाहतीत पत्नीसोबत राहतात. ते 119 बॅचचे प्रोबेशनरी उपनिरीक्षक आहेत. खरात यांची एमएचबी पोलीस ठाण्यातील ही पहिलीच पोस्टिंग होती.