योजनांचा महापूर… महागाईचा भस्मासुर! महागाईविरोधात शिवसेनेचा गडहिंग्लजमध्ये ‘जनआक्रोश’

वाढत्या महागाईविरोधात गडहिंग्लजला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर ‘जनआक्रोश’ मोर्चा काढण्यात आला. ‘योजनांचा महापूर, महागाईचा भस्मासुर’ यासह विविध घोषणा देत राज्य व केंद्र सरकारविरोधात असंतोष व्यक्त करण्यात आला. कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रांताधिकाऱयांना निवेदन देत याकडे लक्ष वेधण्यात आले.

राज्य आणि केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणातून जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ सुरू आहे. ऐन सणासुदीच्या काळात भरमसाट दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाले आहे. गृहिणींचे तर आर्थिक बजेटच कोलमडले आहे. एकीकडे ‘लाडकी बहीण’सारख्या विविध मोफत योजनांचा पाऊस पाडला जात आहे आणि दुसऱया बाजूला महागाईने कहर केला आहे. त्यामुळे जनतेतून शासनाविरुद्ध तीव्र संताप आहे. जीवनावश्यक वस्तू, मसाल्याच्या पदार्थांपासून ज्वारी, गहू, तांदूळ, स्वयंपाकाचा गॅस, तेल अशा वस्तूंच्या किमतींत झालेल्या भरमसाट वाढीने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक नियोजनच कोलमडून गेले आहे. ‘आम्हाला मोफत काही नको, केवळ महागाई कमी करा…’ अशा प्रतिक्रिया सामान्यांतून व्यक्त होत आहेत. हे रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करून वाढती महागाई रोखावी व सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, चंदगड विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर, तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, युवासेना जिल्हा अधिकारी अवधूत पाटील, ऍड. स्नेहल पाटील, शहरप्रमुख संतोष चिकोडे, मीनाक्षी देसाई, सुधा फाळके, वसंत नाईक, सुरेश हेब्बाळे, संदीप चव्हाण, संदीप कुराडे, श्रीशैल साखरे, मनीष हावळ, प्रकाश रावळ, विलास यमाटे, रवि पाटील, सुनील डवरी, संदीप पाटील, सागर हेब्बाळे, मल्लिकार्जुन चौगुले, किरण नागुर्डेकर, भरमू बिरजे यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.