शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकार लक्षच द्यायला तयार नसून, सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे, असा आरोप करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘रास्ता रोको’ करण्यात आला. डाराडूर झोपलेल्या सरकारचे खरे रूप चव्हाटय़ावर आणण्यासाठी शिवसैनिकांनी वेशभूषा करून एक ‘कुंभकर्ण’ आंदोलनात आणला होता; पण पोलीस प्रशासनाने त्यालाही ताब्यात घेऊन टाकले.
महाराष्ट्र सरकार म्हणजे ‘घोषणांचा पाऊस आणि विकासाचा दुष्काळ’ असणारे सरकार आहे. या सरकारने अनेक योजना घोषित केल्या; पण त्यांतील अनेक योजना पूर्ण केल्या नाहीत. महायुती सरकारने एक वर्षापूर्वी सातारा जिह्यासाठी 115 कोटी रुपये पीकविम्यासाठी मंजूर केले होते. यांपैकी केंद्र शासनाने त्यांचा हिस्सा दिला; परंतु महाराष्ट्र शासनाच्या हिश्शाचे 40 कोटी रुपये एक वर्ष झाले तरी हे शासन वर्ग करीत नव्हते. त्यामुळे हे आंदोलन करावे लागत असल्याचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी सांगितले.
2017पासून ज्या-ज्यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, त्या-त्या वेळेस प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानातील एकही रुपया मिळालेला नाही. दुर्गम भागामध्ये वन्यजीवांपासून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते; परंतु त्याची भरपाई शासनाकडून त्या प्रमाणात मिळत नाही. आज शासनाने सोयाबीनला 4800 ते 4900 रुपये हमीभाक जाहीर केलेला आहे; पण या ठिकाणचे क्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. 4100 ते 4200मध्ये सोयाबीन खरेदी केले जात आहे. शेतकऱ्याचा उत्पन्नाचा खर्चदेखील निघत नाही, असा घणाघात सचिन मोहिते यांनी केला.
‘महायुतीचे हे सरकार लबाड आहे. हे झोपेचे सोंग घेतलेले सरकार आहे. म्हणून आज आम्ही ‘कुंभकर्ण’ या ठिकाणी घेऊन आलो होतो; पण त्या कुंभकर्णालासुद्धा यांनी सोडले नाही. पोलीस प्रशासनाने त्यालाही ताब्यात घेतले आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो,’ असा हल्लाबोल केला. ‘शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या तत्काळ पूर्ण झाल्या नाहीत तर या सरकारला हीच जनता सत्तेबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा मोहिते यांनी दिला. आंदोलनात पदाधिकारी, शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.