हरयाणात भाजप तर जम्मू – कश्मीरमध्ये इंडिया आघाडी

हरयाणात भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखली असून राज्यात सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार बनणार आहे. मात्र, सुरुवातीचे कल आणि निवडणूक आयोगाने अपडेट देण्यासाठी केलेला वेळकाढूपणा यावरून निकालात हेराफेरीचा संशय काँग्रेसने घेतला आहे. दुसरीकडे कश्मीरमध्ये जनतेने भाजपला साफ नाकारत इंडिया आघाडीचे घटकपक्ष असणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला बहुमत दिले असून ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

हरयाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या तीन तासांत हरयाणातील जनतेचा कौल भाजपविरोधी असल्याचे स्पष्ट झाले. ‘एक्झिट पोल’चे अंदाज खरे ठरताना दिसत होते. भाजप सरकारविरुद्ध ‘ऍन्टी इन्कम्बन्सी’ची लाट असल्याचे चित्र होते.मात्र, तीन तासांच्या मतमोजणीनंतर भाजपने आघाडी घेतली आणि निकाल फिरले. भाजपला 48, काँग्रेस 37, आयएनएलडी 2 आणि अपक्ष उमेदवार 3 जागांवर निवडून आले.

हरयाणात भाजपने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. 2014च्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या. 2014ला 41 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसलाही 2014 पेक्षा सहा जागा जास्त मिळाल्या. 2014 ला काँग्रेसचे 31 आमदार होते. दुष्यंत चौताला यांच्या जेजेपी पक्षाचा दारूण पराभव झाला. 2014 ला 10 जागा जिंकून भाजपबरोबर जेजेपीने युती केली होती. यावेळी एकही जागा मिळाली नाही. दुष्यंत चौतालाही पराभूत झाले आहेत.

जम्मूकश्मीरात भाजपचे स्वप्न भंगले

जम्मू-कश्मीरमध्ये पहिल्या फेरीपासून नॅशनल कॉन्फरन्सने आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. शेवटपर्यंत ही आघाडी कायम राहिली. एनसी आणि काँग्रेसची आघाडी होती. एनसीने 51 जागा लढवल्या आणि त्यातील तब्बल 42 जागांवर विजय मिळवला आहे. जम्मू-कश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले आहे. भाजपचे उमेदवार केवळ जम्मू विभागात विजयी झाले. भाजपला 29 जागा मिळाल्या. प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांच्यासह अनेक भाजप नेते पराभूत झाले आहेत. रैना यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

पीडीपीला 3 जागा; इत्लिजा मुफ्तींचा पराभव

माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीचा मोठा पराभव झाला आहे.पीडीपीला अवघ्या तीन जागा मिळाल्या. पीडीपीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिजबेहरा मतदारसंघात मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या इत्लिजा मुफ्ती यांचा पराभव झाला आहे.

जनतेला दिलेली वचने पाळू ओमर अब्दुल्ला

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे बडगाम आणि गंदरबल या दोन मतदारसंघातून विजयी झाले. ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी घोषणा डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी केली. ओमर हे 2009 ते 2015 या काळात जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री होते. ओमर अब्दुल्ला यांनी जनतेचे आभार मानले असून, अपेक्षेपेक्षा मोठा विजय मिळवून दिला आहे, आम्ही जनतेला दिलेली वचने पाळू, असेही त्यांनी सांगितले.

विनेशने मैदान मारले

ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे मैदान गाजवणाऱ्या विनेश पह्गट यांनी  विधानसभा निवडणुकीच्या राजकीय आखाडय़ात पहिल्याच डावात मैदान मारले आहे. काँग्रेस उमेदवार विनेश फोगट यांनी जुलाना मतदारसंघात भाजपचे योगेश कुमार यांचा 6015 मतांनी पराभव केला. नेहमीच संघर्षाचा मार्ग निवडणाऱ्या प्रत्येक मुलीचा हा विजय आहे. जनतेचे हे प्रेम मी सदैव जपून ठेवीन, अशी प्रतिक्रिया विनेशने दिली.

पहिल्या तीन तासांत अकरापर्यंत काँग्रेसचा वोट शेअर 40.5 तर भाजपचा वोट शेअर 38.7 होता. काँग्रेसने  50 जागांवर आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर अचानक उलटफेर होऊन भाजपने आघाडी घेतली.

कुछ तो गडबड है!

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निकालाचे अपडेट करण्यास उशीर होत आहे. हिस्सार, महेंद्रगड आणि पानीपत या तीन जिह्यांमध्ये ईव्हीएममध्ये गडबड झाल्याच्या तक्रारी काँग्रेस उमेदवारांनी केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला.

हरयाणाचे निकाल धक्कादायक आहेत. आम्ही हे निकाल स्वीकारू शकत नाही. येथे लोकशाहीचा पराभव झाला असून, भाजपच्या व्यवस्थेचा विजय झाला आहे. सर्व तक्रारी निवडणूक आयोगासमोर ठेवल्या जातील, असे रमेश यांनी सांगितले.

निकाल मान्य नाही

हरयाणाचे निकाल पूर्णपणे अनपेक्षित आहेत. हे निकाल मान्य नाहीत, असे पवन खेडा यांनी सांगितले. ज्या मशीनच्या बॅटरी 99 टक्के चार्ज आहेत तेथे काँग्रेस उमेदवार हरताहेत आणि ज्या मशीनला हातही लावला जात नाही, ज्यांच्या बॅटरी 60-70 टक्के चार्ज झाल्या तेथे विजयी होताहेत, असे खेडा यांनी सांगितले.

काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

काँग्रेसच्या अनेक जागा कमी फरकाने गेल्याचे काँग्रेस नेते आणि हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा म्हणाले. आम्हाला जनतेचा निर्णय मान्य आहे, मात्र पक्षात समन्वयाचा अभाव होता असे म्हणता येणार नाही. अनेक ठिकाणांहून उमेदवारांच्या तक्रारी आल्या असून लवकरच निवडणूक आयोगाची भेट घेऊन त्यांच्यासमोर या तक्रारी मांडणार असल्याचे हुड्डा यांनी निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

जम्मू-कश्मीर

नॅशनल कॉन्फरन्स 42

काँग्रेस 06

भाजप 29

पीडीपी 03

आप 01

इतर 09

हरयाणा

भाजप 48

काँग्रेस 37

लोकदल 02

इतर 03