नेट रनरेटच टार्गेट; श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय नोंदवण्यासाठीच हिंदुस्थानी महिला उतरणार

पाकिस्तानला हरवूनही गुणतालिकेत त्यांच्या मागे असलेल्या हिंदुस्थानी संघ श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत नेट रनरेट वाढवण्याचे टार्गेटच डोळय़ांसमोर घेऊन उतरणार आहे. आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी हिंदुस्थानला उर्वरित दोन्ही लढती चांगल्या रनरेटने जिंकणे अनिवार्य आहे. नेट रनरेट घसरले की हिंदुस्थानचे आव्हान साखळीतच संपुष्टात येण्याची भीती कायम आहे.

हिंदुस्थानी महिला ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे ध्येयानेच स्पर्धेत उतरल्या आहेत, मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या सलामीच्या लढतीत हिंदुस्थानला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. हा धक्का कुणाच्याही पचनी पडला नव्हता. तसेच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हिंदुस्थानी महिलांनी विजय नोंदवला असला तरी वेगवान धावा काढणे टाळले. परिणामतः जिंकूनही पाकिस्तान तिसऱ्या तर हिंदुस्थान चौथ्या क्रमांकावर स्थिर राहिला. ‘अ’ गटातून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तानसह हिंदुस्थानलाही उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे, पण याचा फैसला नेट रनरेट ठरवणार आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता एक संघ (ऑस्ट्रेलिया ) थेट उपांत्य फेरी गाठेल, मात्र दुसरा संघ नेट रनरेटच्या लढाईत ठरेल. त्यामुळे नेट रनरेटसाठी वेगात धावा काढणे आणि विजय मिळवणे हेच ध्येय उर्वरित तिन्ही संघाचे राहणार आहे.

हरमनप्रीत खेळणार

हरमनप्रीत कौरची मानेची दुखापत सामान्य असून ती श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरण्यासाठी सज्ज असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी कळवले आहे. त्यामुळे लंकेविरुद्ध मोठा विजय मिळवून हिंदुस्थानी महिला उपांत्य फेरीच्या दिशेने एक दमदार पाऊल टाकण्याचे ध्येय ठेवून उतरणार आहे. कारण हिंदुस्थानची चौथी लढत जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. उपांत्य फेरीचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी लंकेचा धुव्वा उडवत रनरेटमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर झेप घेण्याचे प्रयत्न हिंदुस्थानी महिला करणार आहेत.

फलंदाजांनो, जागे व्हा

हिंदुस्थानी संघासाठी फलंदाजी हाच सध्या डोकेदुखीचा विषय आहे. दोन्ही सामन्यांत हिंदुस्थानच्या आघाडीच्या फलंदाजांना आपला खेळ दाखवण्यात अपयश आले आहे. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधानाने निराशा केली आहे. शेफालीच्या बॅटीतून अवघ्या 34 धावा निघाल्या आहेत, तर स्मृतीने 12 आणि 7 धावा केल्या आहेत. मधल्या फळीवरील दबाव कमी करण्यासाठी यो दोघींना चांगली कामगिरी करणे क्रमप्राप्त आहे. हिंदुस्थानी गोलंदाजी दीप्ती शर्माच्या फिरकीवर अवलंबून आहे, पण तीसुद्धा अपेक्षित कामगिरीपर्यंत पोहोचू शकलेली नाही. मात्र श्रेयंका पाटील आणि आशा शोभना यांनी चांगली फिरकी टाकत सर्वांचे लक्ष वेधलेय. लंकेविरुद्ध फिरकीला आपली ताकद दाखवावीच लागेल.