पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीने धडक दिल्याने 9 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी गोवंडीत घडली. बैगनवाडी सिग्नल परिसरात सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. हमीद असे मयत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शिवजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे.
मदरशातून घरी जात असताना हमीदला भरधाव वेगाने येणाऱ्या महापालिकेच्या कचऱ्याच्या वाहनाने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या हमीदचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कचऱ्याच्या वाहनाची तोडफोड करत मानखुर्द-घाटकोपर मार्गावर रास्ता रोको केला. शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले.