चेंबूरमधील सिद्धार्थ नगरमधील एका घराला रविवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत गुप्ता कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आगीच्या घटनेनंतर घरातील 10 तोळे सोने आणि 4.5 लाखाची रोकड गायब झाली आहे.
मयतांच्या नातेवाईकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी गुप्ता कुटुंबातील मुलगी वनिता मदनलाल गुप्ता यांनी पोलिस, महापालिका आयुक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
गुप्ता कुटुंबात एकूण 9 जण राहत होते. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला. मयतांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी वनिता गुप्ता यांना रुग्णालयात बोलावले होते.
रुग्णालयात गेल्यानंतर पोलिसांनी महिलेकडे कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड मागितले. ते घेण्यासाठी वनिता गुप्ता या घरी आल्या होत्या. आधारकार्ड काढण्यासाठी त्या कपाटाकडे गेल्या तेव्हा लॉकर तुटलेले आणि त्यातील सोने आणि पैसे गायब असल्याचे कळले, असे वनिता गुप्ता यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
गुप्ता यांचे वडील आणि भाऊ आगीतून बचावले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकरमध्ये एक मंगळसूत्र, अनेक अंगठ्या, सहा बांगड्या, कानातले आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या, असे वनिता यांनी सांगितले.