हरियाणा आणि जम्मू कश्मीर विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला. हरियाणात भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याच्या वाटेवर असून जम्मू कश्मीरमध्ये इंडिया आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. आम आदमी पार्टीनेही येथे खाते उघडले आहे. आपचे उमेदवार मेहराज मलिक यांनी डोडा विधानसभा मतदारसंघातून 4500 हून अधिक मतनी विजय मिळवला आहे.
डीडीसीचे सदस्य असलेल्या मलिक यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. 2014 पासून या जागेवर भाजप, तर त्याआधी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र आता येथे आपने विजय मिळवला आहे. मलिक यांना 23 हजार 228 मते मिळाली, तर भाजपच्या गजय सिंह यांना 18 हजार 690 मते मिळाली. तिसऱ्या स्थानावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मंत्री खालिद नजीब सुहरवर्दी, तर चौथ्या स्थानावर डीपीएपी नेते अब्दुल मजीद वानी राहिले. त्यांना अनुक्रमे 13 हजार 334 आणि 0 हजार 27 मते मिळाली. काँग्रेस उमेदवाराला येथे फक्त 4 हजार 110 मते मिळाली.
विशेष म्हणजे मेहराज मलिक यांनी उधमपूर मतदार संघातून लोकसभा निवडणूकही लढली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी डोडो मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेची चावी हातात आल्यानंतर आम आदमी पार्टीला गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. दिल्ली आणि पंजाबसह गुजरात आणि गोव्यामध्येही आपचे आमदार आहेत. यास आता जम्मू कश्मीरमध्ये ही आपचे खाते उघडले आहे.
मेहराज मलिक हे डोडा भागातील लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या मागे मोठा जनाधार आहे. 2021 मध्ये त्यांनी डीडीसी निवडणूक लढली आणि जिंकली होती. 2022 मध्ये याच भागात त्यांनी एक प्रचंड रॅलीचे आयोजन केले होते. वेळोवेळी प्रशासनाला जाब विचारणारे मलिक हे तेव्हा चांगली चर्चेत आले होते. विधानसभा निवडणुकीवेळी भरलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांनी आपल्याकडे 29 हजारांची संपत्ती असून दोन लाख रुपयांचे कर्ज असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्यांच्यावर काही गुन्हेही दाखल आहेत.
दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये खाते उघडल्यानंतर आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉल करून मेहराज मालिक यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मलिक यांनी केजरीवाल्यांना दहा तारखेला डोळा येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रणही दिले. केजरीवाल यांनी हे निमंत्रण स्वीकारले असून लोकांचे आभार मानण्यासाठी नक्की येईल अशी आश्वासन मलिक यांना दिले.