लाईव्हस्ट्रिमिंगच्या नादात युट्युबरने 1.7 कोटींची कार क्रॅश, व्हिडीओ होतोय व्हायरल

अमेरिकेमध्ये एका युट्युबरला लाइव्हस्ट्रिम करताना गाडी चालविणे चांगलेच महागात पडले आहे. लाइव्हस्ट्रिम करताना गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या रेलिंगला जाऊन धडकली. या अपघातात गाडीत अन्य तरुण गंभीर जखमी झाला असून युट्युबर थोडक्यात बचावला. जॅक डोहर्टी असे त्या युट्युबरचे नाव असून तो थरारक स्टंटसाठी ओळखला जातो. हा अपघात फ्लोरिडाच्या मियामी हायवेवर झाला. त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. सध्या सोशल मीडियावर अपघाताचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये 20 वर्षीय कंटेट क्रिएटर जॅक डोहार्टीला 1.7 कोटी रुपयांची मॅकलारेन सुपरकार चालवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये जॅक गाडी चालवत लाईव्हस्ट्रिमिंग करताना दिसत आहे. दरम्यान त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटते आणि कार रेलिंगवर जाऊन धडकते. त्या व्हिडीओमध्ये यूट्युबर ओरडताना ऐकू येत आहे.

जॅकने 1.7 कोटी रुपयांची मॅकलारेन कार खरेदी केली होती. व्हिडीओमध्ये जॅकच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर त्याला गाडीची अवस्था पाहून पश्चाताप झाल्याचे दिसत आहे. या अपघातानंतर त्याने अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो गाडीत अडकलेल्या अवस्थेत दिसत असून मदतीसाठी ओरडत आहे. रस्त्यावरुन जाणारी लोकं त्याच्या मदतीसाठी धाव घेतात आणि तुटलेल्या खिडकीतून बाहेर पडण्यास मदत करत असल्याचे दिसून येते.

या घटनेमुळे जॅकवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. नेटिझन्सने त्याच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म किकने तत्काळ कारवाई करत त्याचे अकाउंट बॅन केले आहे.