डिग्री तसेच आयटीआय प्रशिक्षण घेतले असतानादेखील स्थानिकांना डावलून वडाखालच्या जेएसडब्ल्यू कंपनीत उपऱ्यांची भरती करण्यात आली आहे. याबाबत गेल्या दीड वर्षापासून कंपनी व्यवस्थापनाबरोबर बैठक घेऊनही कानाडोळा केला जात असल्याने संतप्त झालेल्या पेणच्या काराववासीयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच सदस्यांनीही कंपनीच्या गोवा गेटवर ठिय्या दिला आहे. भूमिपुत्रांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारादेखील ग्रामस्थांनी दिला आहे.
जेएसडब्ल्यू कंपनीकडे काराव ग्रामपंचायतने स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध देण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत. अनेकवेळा कंपनी प्रशासनाबरोबर यासंदर्भात बैठकाही झाल्या. परंतु कंपनीने कायम ग्रामस्थांची फसवणूकच केल्याचा आरोप सरपंच मानसी पाटील यांनी केला आहे. कंपनीने 7 नोव्हेंबर 2023 रोजी डिप्लोमा डिग्री व आयटीआय पूर्ण झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. यासाठी गडप काराव ग्रामपंचायत हद्दीमध्ये 85 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते.
– कंपनीने मात्र भरती करताना स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून न घेता उफ्ऱ्यांना संधी दिली. शैक्षणिक पात्रता असताना व्यवस्थापनाने डावलल्याने ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला असून याविरोधात गेल्या दीड वर्षापासून लढा देत आहेत.
– कंपनी कानाडोळा करत असल्याने संतप्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच अन्य सर्व सदस्यांसह ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.
– आंदोलनात सरपंच मानसी पाटील, उपसरपंच दीपाली भोईर, संध्या म्हात्रे, परशुराम मोकल, मनोहर पाटील, मनोज म्हात्रे, सीता पाटील, दीपक कोठेकर, जगदीश कोठेकर, किर्ती म्हात्रे, भाग्यश्री कडू, वैशाली म्हात्रे, मुक्ता वाघमारे, दिनेश म्हात्रे सहभागी झाले आहेत.