अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानगुटीवरून स्मशानभूमीचे भूत उतरले; प्रशासन अंत्यसंस्कारासाठी देणार पर्यायी जागा

अलिबागच्या मेडिकल कॉलेजच्या मानगुटीवरील स्मशानभूमीची भूत अखेर उतरले आहे. जिल्हा प्रशासनाने उसर येथील ग्रामस्थांसोबत बैठक घेत स्मशानभूमीसाठी नवीन जागा देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे तीन वर्षांनंतर हा तिढा सुटल्याने महाविद्यालयाचे रखडलेले बांधकाम मार्गी लागणार असून रायगडकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महाविद्यालयाच्या बांधकामात स्मशानभूमी बाधित होत असल्याने स्थानिकांनी बांधकामाला विरोध दर्शवला होता.

अलिबाग उसर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 55 एकर शासकीय जागा मंजूर झाली आहे. यामधील 25 एकर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार होते. यामध्ये महाविद्यालय, 500 खाटांचे रुग्णालय आणि विद्यार्थी, डॉक्टरांसाठी निवासस्थान बांधण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फेब्रुवारी 2021 मध्ये बांधकामाचा नारळ वाढवण्यात आला होता. यासाठी साडेचारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील कामासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. मात्र सत्ताबदल होताच स्मशानभूमीवरून स्थानिकांच्या विरोधाचे कारण पुढे करीत जिल्हा प्रशासनाने हे काम थांबवले होते.

प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी
जिल्हा प्रशासनाने महाविद्यालयाच्या रखडलेल्या कामाबाबत पुढाकार घेऊन स्थानिकांच्या सोबत बैठक घेत प्रश्न मार्गी लावला आहे. जागेत असलेली स्मशानभूमी ही अन्यत्र सुरक्षितस्थळी स्थलांतरित करून ती अद्ययावत बांधून देण्यात येणार आहे. तसेच पर्यायी रस्ताही दिला जाणार आहे. ही कामे पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयाचे काम सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रांताधिकारी मुकेश चव्हाण यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.