गडकरी म्हणाले; मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, चुकून राजकारणात आलो!

कोणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोक बोलणारे भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात धक्कादायक खुलासा केला. मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, मी चुकून राजकारणात आलो, असे गडकरी म्हणाले.

नागपूर येथील कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी ते महायुती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असताना वन खात्याच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा किस्सा सांगितला. मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, मी चुकून राजकारणात आलो. पण आता पुन्हा चळवळीत आलो-गेलो तर तुम्हाला गोळ्यांनी फुंकल्याशिवाय राहणार नाही, त्यानंतर मी अधिकाऱ्यांसोबत जे केले आहे, ते इकडे सांगू शकणार नाही. यानंतर मेळघाटातील सगळे रस्ते पूर्ण झाले, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार होते. त्या वेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते आणि राज्यपाल अलेक्झांडर होते. त्या वेळी मी राजदूत गाडीवरून मेळघाटातील गावांमध्ये फिरत होतो. तिथल्या रस्त्यांची अवस्था खराब होती. तरीही वन खात्याचे अधिकारी रस्त्याचे काम करू देत नव्हते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुनावले होते. त्या वेळी मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, हा विषय माझ्यावर सोडा. मी बघतो काय करायचे ते ! त्या वेळी आपण वन खात्याच्या अधिकाऱ्यांना धमकावून कामे करून घेतल्याचे गडकरी यांनी सांगितले.

सरकार म्हणजे…

सरकारी प्रक्रियेत एखाद्याला अधिकाऱ्याला शिक्षा करायची असली की ते फार कठीण काम आहे. कारण एखाद्याने फाईल दाबून धरली तर ती वर जात नाही. चांगल्या माणसाला सन्मान नाही आणि वाईट माणसाला शिक्षा नाही म्हणजे सरकार, असे गडकरी म्हणाले.