बेकायदा चाळीची भिंत कोसळून ठार झालेल्या महिलेची परस्पर विल्हेवाट, वसईत चाळमाफियांचा कारनामा

जेवत असतानाच बेकायदा चाळीची भिंत कोसळून त्याखाली चार मजूर दबल्याची धक्कादायक घटना वसईच्या कामण परिसरात घडली आहे. या दुर्घटनेत एक महिला मजूर जागीच ठार झाली असून अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान हे प्रकरण दडपण्यासाठी कंत्राटदारासह मालकाने परिसरातील सीसीटीव्ही गायब केले. तसेच मृत महिलेच्या नातेवाईकांना पैसे देऊन त्यांच्यावर दबाव टाकला आणि मृतदेहाचे शवविच्छेदन न करता परस्पर अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले. शुक्रवारी घडलेल्या या घटनेचा आज बोभाटा होताच याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. चाळमाफियांच्या या कारनाम्याने खळबळ उडाली आहे.

वसई-विरार शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी वसई पूर्वेच्या कामण येथील बेलकवडी परिसरात चाळींचे अनधिकृत बांधकाम सुरू होते. दुपारी दीडच्या सुमारास मजूर जेवण करण्यासाठी बसले होते. त्यावेळी निकृष्ट असलेली भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत रुक्षणा लहाने (22) ही तरुणी जागीच ठार झाली तर अन्य 3 मजूर जखमी झाले. मात्र ठेकेदार आणि विकासकांनी ही दुर्घटना दडपण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मृत महिलेच्या नातेवाईकांवर कुठेही वाच्यता न करण्यासाठी दबाव टाकला. तसेच त्यांना पैसे देऊन मृतदेहाचे शवविच्छेदन न करता मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या गावी पाठवून दिला. इतकेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी परिसरातील गोदामाचे सीसीटीव्हीदेखील काढून टाकले.

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले

कामण गावातील या घटनेचा भंडाफोड होताच नायगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच दिनेश जैन (58), नितीश जैन (33), कन्नन सोनी (40), फराज खान (32) यांना अटक केली असून फरार असलेल्या प्रदीप गुप्ताचा शोध सुरू आहे. या कारवाईच्या तडाख्याने वसई, विरारमधील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ना परवानगी ना कामगारांची सुरक्षा

कंत्राटदार व चाळमालकाने काम करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर आरसीसी बांधकामाचा नकाशादेखील अभियंत्याकडून तयार करून न घेताच मनमर्जीपणे बांधकाम सुरू होते. निकृष्ट बांधकाम आणि मजुरांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्यानेच ही दुर्घटना घडल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.