विद्यमान खासदार विशाल पाटील आणि भाजपाचे माजी खासदार संजय पाटील यांच्यात आज तासगाव येथील जाहीर कार्यक्रमात जोरदार राडा झाला. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले, तर व्यासपीठावर आजी-माजी खासदारांत जोरदार शाब्दिक चकमक उडाली. जिह्याच्या पालकमंत्र्यांसमोरच चाललेला हा प्रकार अखेर पोलिसांच्या मदतीने थांबविण्याचा प्रयत्न झाला.
तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत आज सुरू होता. आपल्या भाषणात खासदार विशाल पाटील यांनी तासगाव शहराच्या रिंगरोडचा महत्त्वाचा प्रश्न आमदार सुमनताई पाटील व युवानेते रोहित पाटील यांनी सोडवल्याचे सांगितले. त्यानंतर माजी खासदार संजय पाटील यांनी आपल्या भाषणात खासदार विशाल पाटील यांनी पोरकटपणा थांबवावा, असे आवाहन करून तासगावच्या रिंगरोडचा प्रश्न आपण सोडविल्याचे सांगताच सभेमध्ये एकच गोंधळ उडाला.
स्वतः खासदार विशाल पाटील व्यासपीठावर उभे राहून तावातावाने आपले म्हणणे मांडत होते. माजी खासदार संजय पाटील व्यासपीठावरून आपले म्हणणे मांडत होते. याचवेळी दोन्ही खासदारांचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत व्यासपीठावर धावले. तर व्यासपीठासमोरील कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. नेमकं काय घडतंय हे कुणालाच कळेना. या घटनेने जिह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे हेही अस्वस्थ झाले. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी व्यासपीठ आणि कार्यक्रमस्थळाचा ताबा घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
तासगाव येथील रिंगरोडसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 173 कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, हा निधी मंजूर करण्यासाठी तासगाव तालुक्यात श्रेयवाद रंगला. खासदार विशाल पाटील व माजी खासदार संजय पाटील यांच्यात हमरीतुमरी झाल्यामुळे वातावरण तापले. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत त्यांना बाहेर काढले आणि व्यासपीठाचा ताबा घेतला. या घटनेमुळे तासगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नुकताच कवठेमहांकाळ तालुक्यातील सरपंच निवडणुकीदरम्यान खासदार विशाल पाटील, युवानेते रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यात जोरदार वाद रंगला होता. यावेळी खासदार विशाल पाटील यांच्यासह रोहित पाटील, आमदार सुमन पाटील यांनी पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडून माजी खासदार संजय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते. आजच्या या वादाला कवठेमहांकाळच्या या घटनेची किनार असल्याची चर्चा सुरू होती.