नाटय़क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ‘विष्णुदास भावे गौरव पदक 2024’ सन्मान ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला. पुरस्काराचे हे 57 वे वर्ष आहे. गौरवपदक, रोख रक्कम 25 हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल.
अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर समिती, सांगली ही संस्था गेली 80 वर्ष नाटय़क्षेत्रात कार्य करीत आहे. या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. सुहास जोशी यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाटय़ क्षेत्रातील तसंच नाटय़ प्रशिक्षिण अशा अनेक क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कार सोहळ्यात 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.