जनुक नियमनात सुक्ष्म आरएनए बजावत असलेल्या भूमिकेबद्दल दिशादर्शक संशोधन करणारे अमेरिकेचे शास्त्रज्ञ व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना 2024चे वैद्यक क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. जिवांचा विकास आणि कार्य कसे होते याचे आकलन होण्यात मदत करणारे हे महत्त्वाचे मूलभूत संशोधन असल्याचे नोबेल अकादमीने म्हटले आहे. सध्या मॅसॅच्युसेट्स मेडिकल स्कूल विद्यापीठात नैसर्गिक विज्ञानाचे प्राध्यापक असलेले अॅम्ब्रोस यांनी हार्वर्ड विद्यापीठात हे संशोधन कार्य केले. अनुवांशिकता शास्त्राचे प्राध्यापक असलेल्या रुवकुन यांनी मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये हे संशोधन केले, असे नोबेल समितीचे सरचिटणीस थॉमस पर्लमन यांनी सांगितले.