पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्या खेळाडूंवर हरयाणा-केरळ सरकारने दोन-अडीच कोटींच्या बक्षीसाची उधळण केली होती, मात्र महाराष्ट्राच्या राज्य सरकारने नेमबाज स्वप्निल कुसाळेला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करून त्याच्यावर अन्याय केल्याची भावना दै. सामनाने सर्वांसमोर आणली. या वृत्तानंतर दीड महिन्यांनी का होईना राज्य सरकारला जाग आली आणि त्यांनी ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत दुप्पट वाढ केली. पण महाराष्ट्राचा ७२ वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपविणार्या या खेळाडूला राज्य सरकारने जाहीर केलेल्या बक्षिसाची रक्कम अद्यापही दिलेली नाही, अशी खंत स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने पाच कांस्य पदके जिंकली होती. त्यात चार वैयक्तिक आणि एक सांघिक होते. हिंदुस्थानात खेळामध्ये सर्वात पुढे असलेल्या हरयाणाने आपल्या कांस्यपदक विजेत्यांना चक्क अडीच कोटी रुपये दिले तर रौप्य जिंकणार्या नीरज चोप्राला चार कोटींच्या बक्षीसाने खुश केले. पण महाराष्ट्राच्या सरकारला तेव्हा हे सुचले नाही. दै सामनाने याप्रकरणी वृत्त प्रसिद्ध करून क्रीडाप्रेमींच्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता राज्य सरकारने कांस्य विजेत्याच्या रकमेत दुप्पट वाढ करत ते इनाम दोन कोटींचे करत आपली लाज राखण्याचा प्रयत्न केला, पण आज पदकविजेत्या स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांनी मिंधे सरकारची चालबाजी चव्हाट्यावर आणली आहे. सरकारने दीड महिन्यापूर्वी पुरस्कार जाहीर करून टाळ्या मिळवल्या. मात्र अद्याप स्वप्निलला पुरस्कार देण्यासाठी त्यांना वेळच मिळालेला नाही. स्वप्निलला खेळातील दर्जा आणि सातत्य कायम ठेवायचे असेल आणि आगामी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालायची असेल, तर त्याला उच्च दर्जाच्या सरावाची गरज आहे. तसेच बक्षिसाची रक्कम दोन कोटी नव्हे तर पाच कोटी करावी, अशी मागणीही सुरेश कुसाळे यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राधानगरी तालुक्यातील नेमबाज स्वप्निल कुसाळे याने कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला होता. याच ऑलिम्पिक स्पर्धेत हरियाणासारख्या राज्यातील खेळाडूंनी ४ पदके पटकावली. महाराष्ट्रात स्वप्नील या एकाच खेळाडूने हे कांस्यपदक िंजकले आहे. असे असताना राज्य सरकारने सुवर्णपदकासाठी ५ कोटी, रौप्यपदकासाठी ३ कोटी आणि कांस्यपदकासाठी २ कोटी रूपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. मात्र, ही रक्कम ऑलिम्पिक स्पर्धेनंतर दोन महिन्यांनी जाहीर केली. राज्यात कुणी सुवर्णपदक जिंकले नसेल, तर ही रक्कम कुणासाठी घोषित केली, असा सवालही सुरेश कुसाळे यांनी उपस्थित केला. हरियाणा हे राज्य इतके लहान असून सुद्धा त्यांनी राज्य खेळाडूंना मोठं बक्षीस देऊन गौरव केला. क्रिकेटपटूंना तर पाचव्याच दिवशी विधिमंडळात बोलवून सन्मानित केले जाते. मात्र, स्वप्नीलने पदक जिंकून दोन महिने झाले तरी त्याचा एक फुलसुद्धा देऊन गौरव केला जात नाही. हे महाराष्ट्रातील नेमबाजांचे दुर्दैव म्हणावे लागेल, अशी खंतही सुरेश कुसाळे यांनी व्यक्त केली.