कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी आरोपी संजय रॉय याच्याविरोधात आता सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने या प्रकरणाचा प्रत्येक पैलूचा तपास केला आहे. सीबीआयने आज या प्रकरणी सियालदह न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी सीबीआयने आधीच तुरुंगात असलेला आरोपी संजय रॉय याचे मुख्य आरोपी म्हणून नाव दिले आहे.
कोलकाता येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, आरोपी संजय रॉय स्थानिक पोलिसांमध्ये नागरी स्वयंसेवक म्हणून काम करत होता. सीबीआयने आपल्या आरोपपत्रात आरोपीबद्दल म्हटले आहे की, त्याने 9 ऑगस्ट रोजी पिडीतेवर बलात्कार केला ज्यावेळी ती हॉस्पिटलच्या सेमिनार रूममध्ये झोपायला गेली होती.
संजय रॉय यानेच बलात्कार केल्याचे आरोपपत्रात म्हंटले आहे. हॉस्पिटलच्या सेमिनार रूममध्ये तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी एका ज्युनिअर डॉक्टरांना तिचा मृतदेह सापडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय रॉय 9 ऑगस्टला पहाटे 4.03 वाजता सेमिनार रुममध्ये प्रवेश करताना दिसला. तिथून अर्ध्या तासाने तो बाहेर पडला.
कोलकाता पोलिसांना घटनास्थळी आरोपीचे हेडफोन मिळाले. सीबीआयने हे प्रकरण हाताळल्यावर आरोपी रॉय याची लाय-डिटेक्टर टेस्ट केली, त्यावेळी त्याने स्वत:ला निर्दोष सांगितले. त्याने दावा केला की, तो सेमिनार हॉलमध्ये जेव्हा गेला त्यावेळी तरुणी तिथे बेशुद्धावस्थेत पडली होती. ज्यावेळी त्याला विचारण्यात आले की, त्याने या घटनेबाबत पोलिसांना का नाही सांगितले. त्यावेळी तो म्हणाला तिला जखमी अवस्थेत पाहून घाबरलो. तो तपासकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.