कर्नाटकातील बेपत्ता उद्योगपतीचा मृतदेह आढळला, तपासात धक्कादायक खुलासा

कर्नाटकातील माजी काँग्रेसचे आमदार मोहिदिन बावा यांचे भाऊ आणि उद्योगपती मुमताज अली यांचा शोध घेण्यास अखेर पोलिसांना यश आले. अली हे रविवारपासून बेपत्ता होते. मंगळुरुतील एका पुलाजवळ त्यांची कार आढळून आली होती. यानंतर सोमवारी सकाळी फाल्गुनी नदीच्या किनारी अली यांचा मृतदेह आढळून आला. रविवारपासून अली यांचा नदीत शोध सुरू होता. हनी ट्रॅप प्रकरणातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

अली यांच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. महिलेने अली यांना धमकावून, ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळले. यानंतर महिला आणखी पैशांची मागणी करत होती, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.

मुमताज अली हे कर्नाटकातील एक प्रतिष्ठित व्यापारी आणि मिसबाह ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष होते. तसेच स्थानिक समुदायातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. पोलिसांनी अली यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.