Land For Job Case: लालू, तेजस्वी आणि तेजप्रताप यांना दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर

रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात जमिन घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव आणि त्यांच्या दोन्ही मुलांना दिलासा मिळाला आहे. न्यायलयाने एक-एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. आता या प्रकरणावर 25 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होईल.

रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात जमिन घोटाळा प्रकरणासाठी लालू यादव आपल्या दोन मुलांसह दिल्लीच्या राऊज एवेन्यू न्यायालयात सोमवारी हजर झाले होते. रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात जमिन घोटाळा प्रकरणा लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांना राऊज एवेन्यूच्या विशेष न्यायालयाने समन्स जारी केले होते. त्यासोबत न्यायालयाने हेही सांगितले की, याप्रकरणी तेज प्रताप यादव यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयाने सांगितले की, तेज प्रताप एके इंफोसिस लिमिटेडचे डायरेक्टर होते. त्यासाठी त्यांनाही याप्रकरणी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप आहे की, 2004 ते 2009 दरम्यान रेल्वे मंत्री असताना त्यांनी उमेदवारांच्या नातेवाईकांकडून जमीन घेऊन त्यांना नोकरी दिली आहे, असा आरोप सीबीआयने केला आहे. याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने 18 मे 2022 रोजी गुन्हा दाखल केला होता. मागच्या वर्षी 10 ऑक्टोबर रोजी याप्रकरणी आरोपपत्र दाखल करुन 16 लोकांना आरोपी बनविण्यात आले होते.तपास यंत्रणेला एक हार्ड डिस्कही मिळाले होते. यामध्ये नियुक्ती झालेल्या उमेदवारांची यादी होती. ही हार्ड डिस्क मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.