Karachi Airport Blast: कराची विमानतळावर दहशतवादी हल्ला, 2 चीनी नागरिकांसह तिघांचा मृत्यू

कराचीच्या जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 3 विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 नागरिक चीनचे आहेत. हा हल्ला रविवारी रात्री 11च्या सुमारास झाला असून बलूचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. दहशतवाद्यांनी कराची विमानतळावर आयईडी म्हणजेच इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईसने हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे. रविवारी रात्री 11 वाजता हा हल्ला झाला.

पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, कराचीमधील अनेक ठिकाणी स्फोटाचे आवाज आले होते. सुरुवातीच्या वृत्तांनुसार कळले की, दहशतवाद्यांनी एका तेलाच्या टॅंकरमध्ये स्फोट केला, ज्यामध्ये घटनास्थळी असलेल्या 10 गाड्या उडविण्यात आल्या. जखमींना तत्काळ जिन्ना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हा स्फोट रविवारी कराचीच्या जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाला. सिंधचे मुख्यमंत्री सैयद मुराद अली शाह यांनी घटनेबाबत पोलिसांकडून विस्तृत माहिती मागविली आहे आणि अधिकाऱ्यांना जखमींसाठी योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

तर पाकिस्तानमधील चीनी दूतावासाने या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. चीनी दूतावासाकडून सांगण्यात आले की, कराचीमध्ये जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ पोर्ट कासिम इलेक्ट्रिक पावर कंपनीच्या एका ताफ्यावर दहशतवादी हल्ला केला. बलूचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) या दहशतवादी संघटनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या एका वक्तव्यावरुन त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. मात्र पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पुष्टी केलेली नाही.

चिनी दूतावासाने सांगितले की, या घटनेनंतरची परिस्थिती हाताळण्यासाठी चीन पाकिस्तसोबत मिळून काम करत आहे. पाकिस्ताकडून हल्ल्याची सखोल चौकशी करण्यासाठी, गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यासाठी आणि चीनी नागरिक, संस्था आणि पाकिस्तानमधील प्रकल्पांचे संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.