भाजपच्या माजी सरपंचाने 29 लाख रुपये हडपले

कुडूस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि भाजपचे कार्यकर्ते अनंत पाटील याने आपल्या पदाचा गैरवापर करीत 29 लाख 19 हजार 11 रुपयांचा अपहार केला आहे. ही रक्कम भरण्यासाठी सात दिवसांची मुदत गटविकास अधिकारी डी. एन. दांईंगडे यांनी दिली आहे. मुदतीने अपहाराची रक्कम नाही भरली तर पाटील याच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.

2019 मध्ये अनंत पाटील सरपंच म्हणून निवडून आले. पदभार घेताच पाटील यांनी कुडूसमधील कमान, हायमॅक्स, अंगणवाडी दुरुस्ती, कोंझरवाडी स्मशानभूमी अशा अनेक कामांची लाखो रुपयांची बोगस बिले काढली. प्रत्यक्षात मात्र ही कामे झालीच नसल्याचा आरोप सुनील पिंगळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केला होता. ग्रामसेवक सुनील म्हात्रे यांच्या अहवालानुसार अनंत पाटील यांनी 29 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले. चौकशी अहवालानुसार कायमस्वरूपी 2 लाख 9 हजार 829 रुपये तसेच संशयित 27 लाख 9 हजार 282 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका गटविकास अधिकारी डी. एन. दाईंगडे यांनी ठेवला आहे.