जमिनीवर कब्जा करण्याच्या वादातून सात महिन्यांपूर्वी कल्याण पूर्वेत भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केला होता. ही घटना ताजी असतानाच आता मिंधेंच्या आणखी एका पदाधिकाऱ्याने गरीब वृद्धेचे घर जनाबाई दिवटे आणि जमीन बळकावल्याचे प्रकरण उघड झाले आहे.
माजी नगरसेवक नीलेश शिंदे यांनी कुलमुखत्यारपत्राचा बेकायदा वापर करून नेतिवली येथील 85 वर्षांच्या जनाबाई दिवटे यांना बेघर केले आहे. न्यायासाठी उंबरठे झिजवूनही पोलीस साधी तक्रारही नोंदवून घेत नसल्याने जनाबाई यांच्यावर दारोदार भटकण्याची वेळ आली आहे.
जनाबाई दिवटे यांचे कल्याण पूर्वेतील चक्कीनाका, नेतिवली येथील दामोदरनगरमध्ये घर आहे. त्यांचे पती दामोदर यांचे 2003 मध्ये निधन झाले. तेव्हापासून त्या एकट्याच राहतात. मोक्याच्या ठिकाणी वडिलोपार्जित घर आणि चार ते पाच एकर जमीन अशी त्यांची प्रॉपर्टी आहे. आजारी असल्याने काही दिवस त्या पुणे येथील नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेल्या होत्या.
या दरम्यान त्यांनी प्रॉपर्टीच्या देखभालीसाठी अशोक मुसळे आणि त्यांचा मुलगा नरेश यांच्या नावे कुलमुखत्यारपत्र केले होते. त्यांना जमिनीची विक्री करण्याचे कोणतेही अधिकार दिलेले नव्हते. तरीही या कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करून एक रुपयाही न देता जनाबाई दिवटे यांची मालमत्ता कोळसेवाडी येथील मिंधे गटाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक नीलेश शिंदे यांच्या मिहीर लॅण्डमार्क्स कंपनीला विकली. राजकीय दबाव टाकून सहदुय्यम निबंधक कार्यालयात बेकायदा खरेदीखतही करण्यात आल्याचा आरोप जनाबाई दिवटे यांनी केला आहे.
कोळसेवाडी पोलिसांनी हाकलले
फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर जनाबाई दिवटे यांनी 24 जून रोजी कोळसेवाडी पोलिसांत धाव घेतली. जमीन आणि घरावर बेकायदा कब्जा केल्याची तक्रार दिली. जमीन हडप करून बेघर करणाऱ्या नीलेश शिंदे, अशोक मुसळे, नरेश मुसळे यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्या न्याय मागत होत्या. मात्र पोलिसांनी त्यांना अक्षरशः हाकलून लावले.