नवी मुंबई विमानतळावर विमान उतरलेच नाही; मिंध्यांचे बोलघेवडे सिडको अध्यक्ष तोंडावर आपटले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी हवाई दलाच्या सुखोई विमानाच्या लॅण्डिगची चाचणी होणार आणि या चाचणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार, अशी मिंध्यांचे बोलघेवडे सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केलेली घोषणा अखेर हवेत विरली आहे.

अध्यक्षांनी 24 सप्टेबर रोजी विमानतळाच्या साईटचा दौरा केल्यानंतर घिसाडघाईमध्ये ही घोषणा केली होती. मात्र काल शनिवारी विमानाचे लॅण्डिग तर सोडाच पण विमानाने साध्या गिरट्याही न घातल्यामुळे अध्यक्ष तोंडावर आपटले आहेत. विशेष म्हणजे अध्यक्षांच्या या घोषणेला सिडको प्रशासन आणि अदानी समूहाने कोणताही दुजोरा दिला नव्हता.

नवी मुंबई विमानतळ जेव्हीके समूहाकडून अदानी समूहाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर पुन्हा नव्याने डेडलाईन जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या मार्च 2025 पर्यंत विमानतळाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्या विमानतळाचे काम 60 टक्क्यांपर्यंत झाले असल्याचा दावा अदानी समूह आणि सिडकोने केला आहे.

पहिल्या टप्प्यात दोन धावपट्ट्या तयार होणार आहेत. त्यापैकी एका धावपट्टीची सिग्नल आणि इन्स्ट्रुमेंटल लॅण्डिग चाचणी यशस्वी झाली आहे. दुसऱ्या धावपट्टीची हिच चाचणी अजून बाकी आहे. इन्स्ट्रुमेंटल लॅण्डिगची चाचणी यशस्वी झाल्यानंतर लायटिंगची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर रडार यंत्रणेची चाचणी होणार आहे. या महत्त्वांच्या चाचण्यांसह सुमारे अर्धा डझन चाचण्या पूर्ण झाल्यानंतर एक व्यावसायिक विमान या धावपट्टीवर उतरवण्यात येणार आहे. हे वास्तव असतानाही सिडकोचे अध्यक्ष शिरसाट यांनी चक्क नवी मुंबई विमातळावर विमानाचे लॅण्डिग होणार, अशी घोषणा केली होती. त्यामुळे त्यांची ही घोषणा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान या विमानतळाच्या कामासाठी सरकारने मार्च 2025 ही डेडलाईन दिली आहे. मात्र शिल्लक राहिलेले काम पाहता ही डेडलाईनही पाळली जाते की नाही, याबाबत अनेक तज्ज्ञांनी शंका उपस्थित केली आहे.

लपवाछपवी कशासाठी?

संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर 24 सप्टेबर रोजी विमानतळाच्या साईटचा दौरा केला. धावपट्टीवर उभे राहून फोटो सेशनही केले. या दौऱ्यासाठी त्यांनी नवी मुंबईतील पत्रकारांनाही बरोबर घेतले होते. मात्र अदानी समूहाने पत्रकारांना गेटवरच रोखून धरून शिरसाट यांना मोठा झटका दिला. विमानतळाच्या कामाबाबत लपवाछपवी कशासाठी केली जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटली होती. त्या दौऱ्यानंतर शिरसाट यांनी थेट विमानाच्या लॅण्डिगची घोषणा केली. इतक्या सर्व चाचण्या आणि काम बाकी असतानाही शिरसाट यांनी थेट विमानाचे लॅण्डिग आणि टेकऑफ जाहीर करून टाकल्याने सिडको प्रशासन आणि अदानी समूहालाही आश्चर्याचा धक्का बसला होता.