संदीप नाईकांना उमेदवारी दिली तर मी बंडखोरी करणार! माजी नगरसेवक भरत जाधव यांचा भाजपला घरचा आहेर

भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे फक्त त्रास देण्यात मास्टर आहेत. गेल्या 20 वर्षांत त्यांच्याकडून फक्त छळवणूक झाली आहे. त्यामुळे त्यांना संदीप नाईक बेलापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात येऊ नये. जर त्यांना पक्षाने उमेदवारी दिली तर मी बंडखोरी करणार आहे, असा इशारा भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना दिला आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना नवी मुंबईत भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्याने वरिष्ठांची डोकेदुखी वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने नवी मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणून संदीप नाईक यांच्या नावाची घोषणा केली. जेव्हापासून संदीप नाईक अध्यक्ष झाले आहेत, तेव्हापासून त्यांची मनमानी सुरू झाली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना डावलले जात आहे. संदीप नाईक यांनी पूर्वीपासून आपल्याला त्रास भरत जाधव दिला आहे. आता ते भाजपमध्ये आल्यानंतरही त्यांची त्रास देण्याची सवय बदलली नाही. त्यामुळे त्यांना बेलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी भरत जाधव यांनी भाजपवाल्यांकडे केली आहे.

जर पक्षाने संदीप नाईक यांना उमेदवारी दिली तर आपण त्यांच्या विरोधात बंडखोरी करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिल्यामुळे नाईक समर्थकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. संदीप नाईक यांच्याकडून जिल्हाध्यक्ष पदही काढून घ्या, असाही आग्रह भरत जाधव यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीकडे धरला आहे.

भर कार्यक्रमातून हाकलून लावले

शहरात पक्षाचे जे कार्यक्रम होतात, त्या सर्वच कार्यक्रमांना फक्त ठरावीक माणसांना बोलावले जाते. आपण पदाधिकारी असूनही आपल्याला कोणतेही निमंत्रण दिले जात नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी विष्णुदास भावे नाट्यगृहात पक्षाचा एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमातून माजी महापौर सागर नाईक यांनी माझ्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना अक्षरशः हाकलून दिले, असाही खळबळजनक आरोप भरत जाधव यांनी केला आहे.