राजकारणाची सध्याची दिशा चांगली नाही. ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यांचा निर्णय आता मतदारांच्याच हातात आहे, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सध्या इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण केले जात आहे की, त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठीही आपली पातळी कमी करावी, असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.
पुणे नवरात्रौ महोत्सवात देण्यात येणाऱ्या ‘महर्षी’ पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. यंदा महर्षी पुरस्काराने बाळासाहेब थोरात यांना गौरविण्यात आले. माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी रामदास फुटाणे, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे आणि सिनेअभिनेते सुनील बर्वे उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले, “राजकारण, समाजकारणाची पार्श्वभूमी घरातच होती. पुण्यात शिकलो. वकील झालो. पुण्याने मला आत्मविश्वास आणि संधी दिली. महर्षी पुरस्काराने ज्यांना गौरविण्यात आले आहे, त्या महान लोकांच्या यादीत माझे नाव पाहून मला आश्चर्य वाटले.”
उल्हासदादा पवार म्हणाले, “बाळासाहेब थोरात यांनी घराण्याचा वारसा सर्वार्थाने जपत पुढे नेत आहेत. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कृषी, सहकार अशा अनेक क्षेत्रांत बाळासाहेबांनी आदर्श निर्माण केले. विधानसभेवर सलग आठ वेळा निवडून जाणे, हा विक्रम त्यांच्या नावावर आहे.”
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी प्रास्ताविकात महर्षी पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. अभिनेते सुनील बर्वे यांनीही मनोगत व्यक्त केले.