महाबळेश्वरमधील ठेक्याची माहिती देताना मुख्याधिकाऱ्यांची बनवाबनवी उघड

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत पालिकेने दिलेल्या तीन वर्षांच्या ठेक्याची माहिती देताना मुख्याधिकारी योगेश पाटील यांची बनवाबनवी जिल्हाधिकाऱयांच्या लक्षात आली. निविदेत ज्या गोष्टी येत नाही त्याचा खर्च निविदेत समाविष्ठ करून मुख्याधिकारी दिशाभूल करीत असल्याचे लक्षात येताच या प्रकरणाची सर्व कागदपत्रे उद्या (सोमवार, दि. 7) सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुख्याधिकारी पाटील यांना दिले.

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहरातून कचरा गोळा करणे, गोळा केलेला कचरा हा डेपोपर्यंत पोहचविणे तसेच शहरातील सर्व रस्ते व गटारे यांची साफसफाई करणे या कामाचा वर्षाला 3 कोटी 75 लाख 5 हजार 925 रुपयांप्रमाणे तीन वर्षांचा ठेका महाबळेश्वर पालिकेने पुणे येथील व्ही.डी.के. फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीला 11 कोटी 25 लाख 17 हजार 775 रुपयांना दिला. जी कामे करण्यासाठी पालिकेला दरवर्षी केवळ सव्वा ते दीड कोटी रुपये खर्च होतो. या ठेक्याविरोधात शहरातील सहा माजी नगराध्यक्ष व अनेक माजी नगरसेवक, पत्रकार व व्यापारी यांनी जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार दाखल करून ठेका रद्द करण्याची मागणी केली होती. याबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकाऱयांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्यासह महाबळेश्वरचे शिष्टमंडळ आणि मुख्याधिकारी पाटील उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी ज्या कामाचा ठेका दिला आहे. ती कामे पालिका सव्वा ते दीड कोटीत करते, ही बाब आकडेवारीनुसार स्पष्ट केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱयांनी मुख्याधिकारी पाटील यांना स्पष्टीकरण मागितले, तेव्हा मुख्याधिकाऱयांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. तसेच त्यांनी स्वच्छता कर्मचाऱयांचा पगारही हिशेबामध्ये धरला. यानंतर मुख्याधिकारी पाटील हे चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी डुडी यांनी या प्रकरणाची सर्व कागदपत्रे घेऊन उद्याच (सोमवार, दि. 7) भेटा, असे आदेश मुख्याधिकारी पाटील दिले. तसेच तोपर्यंत ठेकेदाराला काम देऊ नका, असेही असे आदेश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.