कास पठार पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांवर काळाचा घाला, मोटारीची टेम्पोला धडक; पाच ठार

कास पठार पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या मोटारीने टेम्पोला समोरून धडक दिली. या अपघातात मायलेकरासह चौघे ठार झाले असून, तिघे गंभीर जखमी आहेत. आज पहाटेच्या सुमारास नातेपुतेजवळ हा भीषण अपघात घडला. मृत आणि जखमी सर्व इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील रहिवासी आहेत.

राजेश अनिलकुमार शहा (वय 54), दुर्गेश शंकर घोरपडे (वय 27), कोमल विशाल काळे (वय 32), शिवराज विशाल काळे (वय 10), आकाश दादा लोंढे (वय 25) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर, पल्लवी बसवेश्वर पाटील, अश्विनी दुर्गेश घोरपडे, सूरज लोंढे हे जखमी झाले आहेत.

इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील व्यावसायिक राजेश शहा हे आपले कामगार व कुटुंबीय दुर्गेश घोरपडे, कोमल काळे, शिवराज काळे, आकाश लोंढे, पल्लवी पाटील, अश्विनी घोरपडे यांना घेऊन मोटारीने सातारा येथील कास पठार पाहण्यासाठी निघाले होते.

पहाटेच्या सुमारास नातेपुते येथून जाताना कारंडे (ता. माळशिरस) येथील पुलावर समोरून आलेल्या एका टेम्पोला धडक दिली. यात राजेश शहा, दुर्गेश घोरपडे, कोमल काळे, शिवराज काळे हे जागीच ठार झाले, तर आकाश लोंढे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पल्लवी पाटील, अश्विनी घोरपडे आणि सूरज लोंढे हे गंभीर जखमी आहेत. या अपघातात दोन्ही गाडय़ांचा चक्काचूर झाला असून, जखमींना नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातस्थळी सोलापूर ग्रामीण पोलीसदलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तत्काळ दाखल झाले होते. या अपघातात कोमल काळे व दहा वर्षांचा विशाल काळे या मायलेकरांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.