खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला ‘गोलीगत’ सूरज चव्हाण याने ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर नाव कोरले. सूरज पाचव्या सीजनचा विजेता झाला असून अभिजित सावंत उपविजेता ठरला. रविवारी रंगलेल्या महाअंतिम फेरीत सूत्रसंचालक रितेश देशमुखने विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. सूरजला 25 लाख रुपये, ट्रॉफी आणि बाईक मिळाली.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता कोण होणार या गेल्या 70 दिवसांपासून सुरू असलेल्या सस्पेन्सवरून अखेर पडदा हटला. ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पर्वात 16 सदस्य सहभागी झाले होते. अंतिम फेरीत सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजित सावंत, धनंजय पोवार, अंकिता प्रभुवालावलकर, जान्हवी किल्लेकर यांच्यात विजेतेपदासाठी स्पर्धा रंगली. अखेर यात सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे सूरजने बाजी मारली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एंट्री घेतल्यापासूनच सूरजने स्वतःचे वेगळेपण दाखवले. त्याने वाद घातले, राडे केले. पण त्याहीवेळी त्याने स्वतःची बाजू उत्तम पद्धतीने राखली. प्रत्येक टास्क डोकं लावून खेळला म्हणूनच तो इथवर पोहोचला आणि या पर्वाचा विजेताही ठरला.
माझं स्वप्न पूर्ण झालं. ‘बिग बॉस मराठी’साठी विचारणा होताच मी लगेचच होकार दिला होता. या घराने मला अनेक गोष्टी शिकवल्या. एक चांगला माणूस बनण्याचा मी प्रयत्न केला. प्रेक्षकांना मी भावलो. रसिक प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच ‘बिग बॉस मराठी’चा मी महाविजेता ठरलो. सर्वच प्रेक्षकांचे मनापासून आभार. या मंचाने मला खूप काही दिलंय. मी आयुष्यभर प्रेक्षकांचा ऋणी राहीन, अशी प्रतिक्रिया बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाण यांनी दिली.