हमासने इस्रायलवर वर्षभरापूर्वी केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे गाझा पट्टीत पेटलेला संघर्ष अद्याप शमला नसून, रविवारी पहाटे गाझातील एक मशीद आणि शाळेवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 26 जण ठार आणि 93 जण जखमी झाले.
गाझामधील जबाली निर्वासित छावणीला इस्रायली सैन्याने घेराव घातला आहे. रविवारी सकाळी उत्तर गाझाचा मोठा भागही लष्करी कारवाईसाठी मोकळा करण्याचे आदेश इस्रायलने दिले आहेत. या रहिवाशांनी विस्थापितांची आधीच अतिगर्दी झालेल्या अल-मवासीच्या मानवतावादी मदत विभागात जावे, असे आदेशात म्हटले आहे. मध्य गाझामधील हजारो विस्थापितांनाही हा परिसर रिकामा करण्याचे आदेश शनिवारी इस्रायलने दिले आहेत.
इब रुशद स्कूल आणि देर अल-मधील शुहादा अल-अक्सा मशिदीमध्ये आश्रय घेऊन हमासचे दहशतवादी सक्रिय होते. त्यांच्यावर आम्ही अचूक हल्ले करून कमांड आणि कंट्रोल सेंटर नष्ट केले, असा दावा इस्रायली सैन्याने केला, तर या शाळेत आणि मशिदीत विस्थापित पॅलेस्टिनींनी निवारा घेतला होता, असे हमास संचालित गाझा सरकारी मीडिया कार्यालयाने सांगितले.
गाझामधून रॉकेट्सचा मारा
गाझा संघर्षाला सोमवारी वर्ष पूर्ण होत असतानाच गाझाच्या उत्तर भागातून आज काही रॉकेट्स इस्रायलच्या दिशेने डागली गेली. यातील एक रॉकेट नष्ट करण्यात आले.
लेबनॉनमध्ये आणखी बॉम्बहल्ले
बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरांना शनिवार रात्रीपासून इस्रायलने बॉम्बहल्ल्यात भाजून काढले आहे. रविवारीही हे हल्ले सुरू होते. इस्रायली सैन्याने रविवारी दक्षिण लेबनॉनमधील हौला, मेइस अल-जबाल आणि बिल्डा या गावांसह सुमारे 25 भागांतील रहिवाशांना शहर, गावे सोडण्याचे नवे आदेश जारी केले.