पश्चिम बंगालच्या आरोग्य सचिवांना हटवा, डॉक्टरांचा सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम

आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर सुरक्षेसह विविध मागण्यांसाठी कनिष्ठ डॉक्टरांनी आंदोलन छेडले. 9 ऑगस्टपासून सुरू केलेले हे आंदोलन होते. आता आरोग्य सचिवांना हटवण्यासह नऊ मागण्यांसाठी पुन्हा उपोषणाला सुरुवात झाली असून सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यानंतरही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर बेमुदत उपोषण आंदोलन पुकारण्याचा इशाराही कनिष्ठ डॉक्टरांनी दिला आहे. पहिल्या टप्प्यात सहा कनिष्ठ डॉक्टर उपोषणाला बसणार आहेत.

आंदोलनादरम्यान पुणाला काही झाले किंवा एखाद्याची प्रकृती गंभीर बनली तर त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशाराही सरकारला देण्यात आला आहे. कोलकाता पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर शुक्रवार, 4 ऑक्टोबर रोजी धरमतला परिसरातील डोरिना क्रॉसिंगवर डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले होते. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी ममता सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत 5 ऑक्टोबरला रात्री साडेआठ वाजता संपली. यानंतर कनिष्ठ डॉक्टरांनी पुन्हा उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

उत्सवात सहभागी होण्यासाठी धमक्या

पहिल्या टप्प्यात सहा कनिष्ठ डॉक्टर उपोषणाला बसणार असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. आंदोलन सुरू करून सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम दिल्यानंतर धमक्या येत असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. तसेच उत्सवात सहभागी होण्यासाठीही धमक्या येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकार आश्वासने पूर्ण करत नसल्याने काम पूर्णपणे बंद करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

महिलेवर बलात्कार करून कीटकनाशक पाजले

पश्चिम बंगालच्या 24 परगणा जिह्यात शनिवारी दहा वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करत संतप्त स्थानिकांनी पोलीस चौकी पेटवून दिली. या घटनेला 24 तासही उलटत नाहीत तोवर पूर्व मेदीनीपूर येथील भूपतीनगरमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. तिला कीटकनाशक पाजून ठार मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. त्यानंतर स्थानिक महिलांनी या महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल केले आणि आरोपीच्या घरावर हल्ला करत काठय़ांनी जबर मारहाण केली. दरम्यान, दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱया 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.