मुंबईत एकीकडे नवरात्रोत्सवाचा उत्साह असताना चेंबूरच्या सिद्धार्थनगरमध्ये भल्यापहाटे घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत गुप्ता कुटुंबातील दोन मुली, एक मुलगा, दोन महिला आणि एका ज्येष्ठाचा मृत्यू झाला. गाढ झोप असतानाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
चेंबूर पूर्व, ए. एन. गायकवाड मार्ग, प्लॉट नंबर 16/1 सिद्धार्थ कॉलनी येथील चाळीत रविवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास गुप्ता कुटुंबाच्या दुकान आणि घर असलेल्या वरील भागात अचानकपणे आग लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या आगीत दुकानातील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक उपकरणे आदी सामानामुळे आग वेगाने भडकली. या आगीत गुप्ता कुटुंबातील सात सदस्य अडकले होते. आगीमुळे प्रचंड आरडाओरडा झाल्याने काही स्थानिक लोक मदतीला धावले. या आगीची माहिती अग्निशमन दलाला देताच त्यांनी तातडीने दाखल होत बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 4 फायर इंजिन, 2 जम्बो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सकाळी 9.15 वाजता सदर आगीवर नियंत्रण मिळवून आग संपूर्णपणे विझविण्यात आली. दरम्यान, या आगीतून गुप्ता कुटुंबातील गंभीर जखमी सात सदस्यांना बाहेर काढून तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस करीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे जाहीर केले. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मृतांची नावे
प्रेम छेदिराम गुप्ता (30), मंजू प्रेम गुप्ता (30/ महिला), प्रेसी प्रएम गुप्ता (6/मुलगी), नरेंद्र गुप्ता (10/ मुलगा), गीतादेवी धरमदेव गुप्ता (60/ महिला), अनिता धरमदेव गुप्ता (39/ महिला) आणि विधी छेदिराम गुप्ता (15/ मुलगी).