मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आज एका अर्थाने युतीची प्रचार सभाच झाली. तीन सत्ताधारी पक्षांची निवडणूक चिन्हे लोकांच्या मनातून पुसली गेल्यानेच आज घसा कोरडा होईपर्यंत ओरडून ती लोकांना सांगावी लागली असा हल्लाबोल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्सवरून मिंधे सरकारवर केला.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला मेळावा झाला. यावर दानवे यांनी ट्वीट करून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, मराठवाड्याचा दुष्काळ इतिहासजमा करू असे जुनेच आश्वासन दिले गेले! आता खरं तर जेवढ्या जुन्या कृष्णा-गोदा या महाराष्ट्राच्या नद्या आहेत, तेवढेच जुने हे आश्वासन झाल्याचे लोकांना कळून चुकले हे.
संभाजीनगरच्या पाणी पुरवठा योजनेला यांनी तारीख पे तारीख योजना म्हणून घोषित करायला हवे. मराठवाडा वॉटर ग्रीडचे आश्वासन पुन्हा देता यावे यासाठी तुटपुंजी रक्कम देऊन कागदोपत्री आराखडा तयार करण्यास सांगून तोकडी रक्कम मान्य केली.
पंतप्रधान तुमचेच आहेत, मनात नसले तरी ते तुमच्या कामाचे कौतुक करतात. महाराष्ट्रातून गेल्या आठ महिन्यांत तब्बल 26 हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत. महिला सुरक्षेचा बोजवारा उडालेला असताना 1500 रुपये खात्यात टाकून आपलीच पाठ थोपटून घेणे हा निर्लज्जपणाचा कळस असल्याचा टोला त्यांनी लगावला.
कांदा, कापूस सोयाबीनला मदत देण्याचे ढोंग केवळ लोकसभेच्या पराभवावर पांघरूण घालण्यासाठी लढवलेली शक्कल आहे. शेती, आरक्षणाचे आंदोलन, दुष्काळ, शेती या सगळ्या आघाड्यांवर नापास झालेल्या सरकारला घरी पाठवण्याचा निर्धार आज लोकांनी ही रटाळ भाषणे ऐकून केल्याचे टिवट त्यांनी केले आहे.