कल्याण-डोंबिवली ही शिवसेनेचीच आहे. तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. तिथे भगव्याला गद्दारीचा डाग लागलाय, तो धुऊन टाका आणि मशालीच्या रूपाने भगव्याचे तेज प्रज्ज्वलित करा, पूर्ण कल्याण-डोंबिवली शिवसेनामय करा, असे आवाहन करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मिंध्यांवर जोरदार हल्ला केला.
View this post on Instagram
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती व मिंधे गटाच्या युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी दीपेश म्हात्रे आणि त्यांच्यासोबत आलेल्या अन्य पदाधिकाऱयांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, शिवसेना हिंदुत्वापासून दूर नेली या सगळय़ा भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांनी मिंध्यांच्या पालख्या वाहिल्या. तुमच्याही डोळय़ावर झापड बांधली गेली होती, पण आता सगळय़ांचे डोळे उघडले हे चांगले झाले. ज्याच्या आहारी गेलात ते हिंदुत्व, ती शिवसेना आणि ते विचार बाळासाहेबांचे नाहीत हे तुमच्या लक्षात आले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
View this post on Instagram
उद्धव ठाकरे म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनाधार्जिण्या आणि शिवसेनाप्रेमी कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे. एका बाजूला प्रचंड ताकद, सत्ता, पैसा, झुंडशाही होती. समोर मुख्यमंत्र्यांचं कार्ट उभं होतं. प्रचंड पैसा ओतला, संपूर्ण यंत्रणा वापरली, शिवसेनेच्या साध्या कार्यकर्तीला पाडण्यासाठी पंतप्रधानांना तिथे यावे लागले. तरीही कल्याण-डोंबिवलीकरांनी जवळपास चार लाख मते शिवसेनेच्या भगव्याला दिली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
याप्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, उपनेते व कल्याण संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, माजी आमदार सुभाष भोईर तसेच कल्याण-डोंबिवलीमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
ठाण्यात शिवसेना वाढवण्यासाठी जोमाने काम करू – दीपेश म्हात्रे
ठाणे जिह्यात शिवसेना पक्ष संघटना वाढवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद असे सर्व काही वापरून काम करू, आता आपला एकही कार्यकर्ता इतर कुठेही जाणार नाही, असे वचन याप्रसंगी दीपेश म्हात्रे यांनी दिले. सत्ताधारी पक्षात असूनही आम्हाला योग्य वागणूक मिळत नव्हती, आमच्यावर गुन्हे दाखल केले, हा अन्याय करणाऱयांना आणि महाराष्ट्र तोडण्याचे काम करणाऱयांना सोडून आम्ही शिवसेनेत आलो आहोत. आम्ही महाराष्ट्र जोडण्याचे काम करणार आहोत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. दीपेश म्हात्रे यांच्यासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, रत्ना म्हात्रे, सुलोचना म्हात्रे, संगीता भोईर, वसंत भगत आणि संपत्ती शेलार यांनीही शिवबंधन हाती बांधून भगवा खांद्यावर घेतला.
महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि नव्हता आणि कधीच असू शकत नाही. तोच विचार घेऊन मी शिवसेना पुढे नेतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आपण जगू ते स्वाभिमानाने, लाचारी पत्करून जगणार नाही. हिंदुहृदयसम्राट आपल्याला सांगत आले की, एकच दिवस जगायचे असेल तर वाघासारखे जगा, शेळीसारखे नाही. आज अशा अनेक शेळय़ा तिकडे शेपटय़ा हलवत भाजपची गुलामगिरी करत आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मिंधेंना झोडपले. थोडा आधी निर्णय घेतला असतात तर ही गुंडगिरी आणि जुलूमशाही लोकसभेतच गाडून टाकली असती, असेही ते दीपेश म्हात्रे यांना म्हणाले.
सत्तेसाठी मिंध्यांकडे गेलेल्या गद्दारांना शिवसेनेत घेणार नाही
सत्तेच्या लोभापायी केवळ चांगले चाललेले महाविकास आघाडीचे सरकार पाडलेच नाही, तर शिवसेना संपवायला निघालेत त्या गद्दारांना शिवसेनेत पुन्हा घेणार नाही आणि सत्तेसाठी मिंध्यांबरोबर गेलेल्या, सत्तेची पदे भोगणाऱया नालायकांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. धाकदपटशा दाखवला गेल्याने, त्यांची दिशाभूल झाल्याने जे साधे कार्यकर्ते मिंध्यांकडे गेले त्यांना मी पुन्हा शिवसेनेत घेतोय. कारण हीच खरी शिवसेनेची ताकद आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
मिंधे गटाला भगदाड दीपेश म्हात्रे शिवसेनेत
कल्याण-डोंबिवलीत आज मिंधे गटाला जबरदस्त हादरा बसला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती व मिंधे गटाच्या युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी सहा माजी नगरसेवक व अन्य पदाधिकाऱयांसह आज शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेसुद्धा यावेळी उपस्थित होते. आपच्या विधानसभा अध्यक्ष अक्षरा मनोज पाटील व अनेकपदाधिकाऱयांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती, शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी रविवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, उपनेते व कल्याण संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत उपस्थित होते.