जेव्हा सुटलेली ट्रेन पकडली जाते

<<< द्वारकानाथ संझगिरी >>>

ट्रेन वेळेवर सुटते. शेवटच्या क्षणाला ट्रेन सुटता सुटता एक व्यक्ती ट्रेन पकडते. त्याचा रिझर्व्ह कोच लांब असतो. तो लोकांचे धक्के आणि वाकड्या नजरा झेलत कसाबसा आपल्या डब्याजवळ पोचतो. त्या टू टायर कंपार्टमेंटमध्ये एकूण चार बर्थ असतात. म्हणजे चार जागा असतात. दोन बर्थ रिकामेच असतात. एका बर्थवर अप्रतिम सुंदर तरुणी बसलेली असते. जणू आधीची माधुरी दीक्षित. ओळख होते आणि काही दिवसांनी लग्नपत्रिकेत दोघांची नावंही उमटतात. अशीच ती व्यक्ती आणि भाग्य म्हणजे, हिंदुस्थानने ग्रीन पार्कवर बांगलादेशविरुद्ध मिळवलेला विजय. ट्रेन सुटताना दिसली तरी पकडायचा प्रयत्न तर करायचा! जय हिंदुस्थान!

माझा मित्र विश्वास बिडकर यांनी परवा हिंदुस्थानने बांगलादेशविरुद्ध जिंकलेल्या मॅचचं असं खुमासदार वर्णन केलं. अगदी थोडक्यात! खरंतर पाऊस आला, रस्ते तुंबले आणि गाडी धावपळ करत पकडावी लागली. हिंदुस्थानी संघाची एंट्री गार्डच्या नंतरच्या डब्यात झाली; पण तिथून पुढचा आपली सीट मिळवायचा प्रवास रोमहर्षक होता. जवळपास अडीच दिवस पावसामुळे फुकट गेल्यानंतर हिंदुस्थानने शांतपणे सामना अनिर्णीत ठेवून ही मालिका एक-शून्य अशी जिंकली असती तरी कोणीही काही बोललं नसतं. पण हिंदुस्थानने विजयाकडे झेप घ्यायचं ठरवलं आणि ती झेप संस्मरणीय ठरली.

खरंतर हिंदुस्थान-बांगलादेश कसोटी मालिकेकडे मी फारसे उत्साहात कधी पाहिलेच नाही. अलीअलीकडे कसोटी क्रिकेट म्हटलं की हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया किंवा हिंदुस्थान-इंग्लंड तेही इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेबद्दल कुतूहल असतं. हिंदुस्थानात येण्यापूर्वी पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये बांगलादेशने हरवले, पण आता पाकिस्तानी क्रिकेट संघ त्या देशाच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे डबघाईस आलाय. पण दोन गोष्टींनी डोळे सुखावले.

एक म्हणजे पहिल्या कसोटीतला मॅच वाचवणारा आणि मग मॅच जिंकून देणाऱ्या रविचंद्रन अश्विन याचं दिमाखदार शतक. खालच्या क्रमांकावर येऊन त्याने आघाडीच्या फलंदाजासारखी फलंदाजी केली. त्याचे ते बॅकफूट आणि फ्रंटफूट ड्राइव्ह आणि एकंदरीत त्याचं फलंदाजीचं तंत्र पाहिल्यावर असं वाटतं की त्याच्यातल्या गोलंदाजाने त्याच्यातल्या फलंदाजाचा गळा घोटला आहे. त्याने क्रिकेट करिअरची सुरुवात आघाडीचा फलंदाज म्हणून केली आणि मग तो जागतिक क्रिकेटच्या इतिहासातला महान ऑफस्पिनर झाला. खरंतर आघाडीच्या फलंदाजाने दोन-चार गोष्टी त्याच्याकडून शिकाव्यात, अशी फलंदाजी त्याने केली.

दुसरी कसोटी म्हणजे मनमोहन देसाईचा सिनेमाच होता. त्याच्या सिनेमात तो अचाट गोष्टी दाखवायचा आणि तो सिनेमा पाहणारा विश्वास ठेवायचा. इथे अचाट गोष्ट खरी ठरली. हिंदुस्थानी संघाने लिहिलेली पटकथा पाहून मनमोहन देसाईनेसुद्धा आश्चर्याने डोळे वटारले असते. बांगलादेशचा पहिल्या डावात ऑलडाऊन झाल्यावर ‘आम्ही जिंकणार’ हा नारा प्रत्येकाची बॅट देतेय असं वाटत होतं. ज्या पद्धतीने कर्णधार रोहित शर्माने पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले ती पुढच्या नाटकाची नांदी होती.

एक डाव हातात असल्यामुळे आक्रमण पूर्णपणे करणे फारसं धोक्याचं नव्हतं आणि हिंदुस्थानी संघाने जे आक्रमण केलं ते पाहून मला हिटलरने लंडनवर लागोपाठ 90 दिवस केलेल्या बॉम्बफेकीची आठवण झाली. थोडीसुद्धा उसंत त्याने इंग्लिश मंडळींना दिली नाही. पण इंग्लंड त्यातून बाहेर आलं. कारण त्यांचा नेता चर्चिल होता. बांगलादेशकडे पुणीही चर्चिल नव्हता. बांगलादेशचा संघ त्यात गोंधळून गेला. संपूर्ण डावाचा विचार केला तर हिंदुस्थानी संघाने सरासरी आठ-साडेआठच्या रनरेटने धावा केल्या. वन डे आणि विशेषतः टी-ट्वेंटीमुळे खेळाडूंची मानसिकता बदलली आहे. ही बदललेली मानसिकता बऱयाच वेळेला कसोटीतसुद्धा दिसते आणि त्यामुळे कसोटी क्रिकेट हे जास्त रंगतदार झाले. पूर्वीच्या काळात हा सामना ड्रॉ करण्याच्या विचारात कॅप्टन्स असले असते, पण इथे जिंकण्याचा विचार हिंदुस्थानी संघाच्या डोक्यातून गेलाच नाही.

चटकन आठवणारे असे जुने उदाहरण म्हणजे 1971 साली इंग्लंडमध्ये हिंदुस्थानला शेवटच्या दिवशी जिंकायला 150-175 धावा हव्या होत्या आणि टी टाईमनंतर पाऊस येईल अशी अपेक्षा होती. जिंकण्याच्या दृष्टिकोनातून अजित वाडेकरने इंजिनीयरला वरच्या क्रमांकावर पाठवलं आणि त्याने आणि सुनील गावसकरने प्रखर हल्ला केला. हिंदुस्थानी संघ जिंकणार असं वाटत असताना इंजिनीयर व सुनील बाद झाले आणि त्यानंतर टी टाईमला हिंदुस्थानची परिस्थिती जिंकण्यासाठी 38 धावा आणि हातात दोन विकेट अशी होती. सोलकर नाबाद खेळत होता.

प्रत्येक जण स्वतःच्या विकेटचा विचार न करता आक्रमकपणे खेळला. कसोटीत ही गोष्ट सोपी नसते. टी-20ची गोष्ट वेगळी असते. वाईड बॉल, नो बॉल, बंपर यांचे नियम वेगळे असतात. गोलंदाजांच्या षटकावर बंधने नसतात आणि क्षेत्ररचना वेगळी असते आणि तरी हिंदुस्थानी संघाने अनेक विक्रम करत 50 धावांची आघाडी घेतली. उरलेल्या वेळात दोन विकेट काढल्या. बांगलादेशला शेवटच्या दिवशी नेमकं काय करावं हे कळलं नाही. तरी एका क्षणी त्यांची त्यातल्या त्यात बरी अवस्था होती. पण मग जाडेजाने भागीदारी फोडली आणि अशा मॅचमध्ये एकदा भागीदारी फुटली की भगदाड आपोआप तयार होतात.

हिंदुस्थानी संघातल्या जवळपास प्रत्येक खेळाडूने या विजयामध्ये आपला वाटा उचलला. यशस्वी जैसवालने त्याच्या आणि सेहवागच्या फलंदाजीचा रक्तगट एकच असल्याची भावना दिली. विराट कोहलीने फॉर्म मिळवला, आपल्या गोलंदाजांनी त्यांचा समतोल दाखवून दिला. तात्पर्य काय, ट्रेन चुकू देऊ नका. धावत का होईना पकडा. कदाचित त्यात तुमची माधुरी दीक्षित तुमची वाट पाहत असेल.