अनियंत्रित डंपरने काही दुचाकी आणि चार चारचाकी वाहनांना धडक दिली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले आहेत. राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील लालसोट शहरात रविवारी दुपारी ही घटना घडली.
खडी भरलेल्या एका अनियंत्रित डंपरने अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. या अपघातात एका मुलीसह चौघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. एका गंभीर जखमीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत.
लालसोट ते दौसा या रस्त्याच्या दिशेने मोठा उतार आहे. दुपारी खडी भरलेला डंपर ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झाला. डंपरने केवळ वाहनांनाच नव्हे तर रस्त्यावरून चाललेल्या पादचाऱ्यांनाही धडक दिली. यामध्ये एक मुलगी आणि एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला, असे लालसोटचे एएसपी लोकेश सोनवाल यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, डंपरने आधी बसला धडक दिली. नंतर शहरातील गर्दीच्या ठिकाणी घुसला आणि अनेक दुचाकीस्वार, चारचाकी व पादचाऱ्यांना चिरडले. अपघात एवढा भीषण होता की एका तरुणाचे दोन्ही पाय चिरडले गेले, त्याला काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली.
अपघातामुळे संतप्त झालेल्या लोकांनी बाजारपेठ बंद करून रास्ता रोको केला. दिवसा शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असल्याने या भीषण अपघातास नागरिकांनी स्थानिक पोलिसांना जबाबदार धरले आहे.