असं म्हटलं जातं की, आताच 8 अब्जांच्या घरात असलेली जागतिक लोकसंख्या येत्या चाळीस-पन्नास वर्षांत आणखी (गुणाकाराने) वाढली आणि वातावरणीय बदल, बेभरवशाचा पाऊस, प्रचंड दुष्काळ यामुळे अन्नधान्याचं उत्पादन आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. अर्थात असं होऊ नये म्हणून अनेक संशोधक कमी जागेत सुरक्षित शेती, कमी पाणी वापरून पीक घेणं यावर प्रयोग करत आहेत.
पीक-पाण्याची मूलभूत समस्या सुटणं हे माणूस आणि सर्वच जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहे. पिकाचं उत्पादनही आरोग्याला सुरक्षित असलं पाहिजे, कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर टाळायला हवा आणि कमी जागेत जास्त धान्योत्पादन कसं होईल याचाही विचार करावाच लागेल. त्याशिवाय वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीखालची जमीन राहत्या घरांसाठी वापरली जाताना गेली अनेक वर्षे जगात सगळीकडे तसं आपल्याकडेही दिसतंय.
माझ्या लहानपणी, मुंबईच्या मानखुर्द भागातली भातशेती किंवा दादर-माहीम भागातल्या नारळाच्या बागा दिसत असत. आमच्याच घरासमोर अनेक पालेभाज्या पिकवणारा मळा होता आणि तो मोटेच्या पाण्याने शिंपला जायचा! आता या सगळ्या गोष्टी आश्चर्यकारक वाटतील. बोरीबंदर किंवा फणसवाडी, चिंचपोकळी (की पोकळी) ही नावं तिथल्या बागायतीवरून किंवा वनश्रीमुळेच आली होती. बदलत्या काळात विविध प्रकारच्या समस्यांबरोबरच प्लॅस्टिकचा गेल्या पन्नास ते सत्तर वर्षांमधला वाढता वापर आपल्या खाद्यपदार्थांसह जमिनीही प्रदूषित करत आहे. हे सारं काही लक्षात घेतलं तर समस्या निर्माण झाल्या म्हणून स्वस्थ बसता येत नाही. त्यावर उपाय शोधावेच लागतात. ते काम विविध क्षेत्रातले संशोधक करतात. त्यातलाच एक प्रयोग आहे तो व्हर्टिकल फार्मिंग किंवा उंच इमारतीमधल्या ‘गगनस्पर्शी (स्कायक्रॅपर) शेती’चा आहे.
‘व्हर्टिकल फार्मिंग’ ही संकल्पना 1915 मध्ये गिल्बर्ट एलिस बेली यांनी मांडली; परंतु त्यांच्या कल्पनेतलं व्हर्टिकल फार्मिंग हे विशिष्ट प्रयोगांती, झाडांची, पिकांची मुळे खोलवर आणि वर त्यांची वाढ सरळ (व्हर्टिकल) निरोगी पद्धतीने याबद्दल विचार मांडणारं होतं. 1999 मध्ये हीच ‘व्हर्टिकल फार्मिंग’ची शब्दावली स्वीकारून डिक्सन डिस्पोमीअर यांनी आधुनिक पद्धतीने ‘गगनस्पर्शी शेती’ची कल्पना मांडली. त्यांनी तर अमेरिकेतील मॅनहटन येथील प्रकल्पांतर्गत 50 हजार लोकांना धान्य मिळेल, अशा उंच इमारतीचं ‘मॉडेल’ जगासमोर आणलं. मात्र ते आजतागायत खूप लोकप्रिय झालेलं नाही. कारण सर्वसाधारण छोटा शेतकरी असं फार्मिंग करू शकत नाही. ते फार खर्चिक आहे. म्हणजे त्याचा ‘स्टार्ट-अप’चा खर्च प्रचंड असतो. मोठ्या प्रमाणावर असं करणं हे सरकार किंवा सहकार अथवा कोणी उद्योजक यांना शक्य आहे. शिवाय त्याचे फायदे आहेत तशाच त्याला मर्यादाही पडतात.
व्हर्टिकल शेतीचा मुख्य फायदा म्हणजे ही पीक-व्यवस्था तशी ‘इनडोअर’ असल्याने हवामानातील बदलांपासून सुरक्षित असते. पूर, अवर्षण याचा परिणाम त्यावर होत नाही. वाऱ्या-वादळापासूनही बचाव होतो. सध्याचं लहरी हवामान, अवकाळी पाऊस, गारपीट अशा संकटाना शेतकऱ्यांला सामोरं जावं लागतं. तो त्रास यामध्ये नाही. तंत्रज्ञानाची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याने कॉम्प्युटरचा वापर करून स्वच्छ, मर्यादित पाणी योग्य प्रमाणात आपोआप (ऑटोमेशन पद्धतीने) मिळण्याची योजना करता येते. एलईडी लाईट वापरून प्रकाशाची गरज भागवता येऊ शकते. लोकसंख्यावाढीला जेवू घालण्यासाठी हा एक चांगला उपाय ठरू शकतो. उत्तम खतं आणि निर्जंतुक, पण मानवी आरोग्याला हानीकारक नसलेली रसायनं वापरून किडीचा बंदोबस्त करता येतो. चांगल्या वाणामुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पादनही मिळू शकतं.
या ‘गगनस्पर्शी शेती’च्या मर्यादा म्हणजे खर्चाचा भार उचलणारे फायद्याचं गणित मांडणारच. त्यामुळे विपुल प्रमाणात धान्योत्पादन झालं तरच ते किफायतशीर ठरणार. शिवाय ‘स्टॅकिंग’ पद्धतीने म्हणजे एकावर एक असलेल्या मजल्यावर विविध पिकं घेता आली तरी त्यांच्यासाठी विविध तापमानाची यंत्रणा बसवावी लागते. त्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे वीजनिर्मिती खूप खर्चिक प्रकार ठरू शकतो. त्यातही सर्वच पिकं या पद्धतीने शक्य नसतात. याला उत्तर म्हणून असंही म्हटलं जातं की, ऊर्जानिर्मितीने ‘ग्रीन हाऊस इफेक्ट’सारखं होणारं प्रदूषण भावी काळातील संशोधनाने नियंत्रित होईल. सोलार एनर्जी अधिक सक्षम झाली तर तोही प्रश्न सुटेल. शिवाय पिकांखालच्या जमिनीवर नैसर्गिक वनश्रीची वाढ झाल्याने हवामानातील उष्णता आटोक्यात राहील. केवळ पाण्यावर, नियंत्रित पद्धतीने होणारी प्रथिनजन्य पिकं सहज घेता येतील. नाजूक पिकांना संरक्षण मिळेल. पिकांना स्वाद, गंध देता येईल आणि डीएनए संशोधनातून त्यांचं उत्पन्न सकस आणि विपुल करता येईल.
तरीही कमी क्षेत्रफळाचे सिंगापूर, इस्रायल, जपान हे देश व्हर्टिकल फार्मिंग करतात. अमेरिकेतही तसे प्रयोग दिसतात. पण हे देश सधन आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडच्या परिस्थितीनुसार आपल्याला अशा प्रकल्पांचा विचार करावा लागेल. मात्र शेतीमध्ये हे वैज्ञानिक प्रयोग रंजक जरूर आहेत, पण ते शेतकऱ्याच्या फायद्याचे ठरले पाहिजेत.
n विनायक