सामना अग्रलेख – मोदी शुद्धीत आहेत ना?

मोदी यांना मागचे आठवत नाही व पुढचे दिसत नाही. लाडकी बहीण योजनेवर झारखंडला जाऊन टीका करायची व महाराष्ट्रात येऊन त्याच राजकीय योजनेचे कौतुक करायचे. पंतप्रधानपदावरील माणसाला असे वागणे व बोलणे शोभत नाही. मोदींना भाषणे लिहून देणाऱ्यांनी हे पथ्य पाळायला हवे. अमली पदार्थांबाबत मोदींची विधाने ही अशीच हास्यास्पद ठरली आहेत. नोटाबंदी केल्यावर अमली पदार्थांची तस्करी थांबेल, असे मोदी म्हणाले होते. उलट ती तस्करी जास्तच वाढली आहे. मोदींचे वागणे, बोलणे आणि त्यांची भाषणे सध्या चेष्टेचा विषय बनली आहेत. महाराष्ट्रातील त्यांच्या दौऱ्यातील भाषणांबाबतही तेच घडले. त्यामुळे मोदी शुद्धीत आहेत ना? असा प्रश्न पडतो 

पंतप्रधान मोदी यांची भाषणे कोण लिहून देत आहेत? हे तपासून घेण्याची वेळ आली आहे. एकतर मोदी यांच्या भाषणात खोटेपणा व ढोंग ठासून भरलेले असते व अनेकदा पंतप्रधानांना विस्मृतीचा आजार जडला आहे काय? अशी शंका त्यांची भाषणे ऐकून किंवा वाचून वाटते. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणांचा संग्रह प्रसिद्ध केला तर त्या संग्रहाचे नाव ‘मी नाही त्यातली’ असेच काहीसे ठेवावे लागेल. पंतप्रधान दोन दिवस महाराष्ट्रात होते. त्यांनी अनेक भाषणे केली, पण त्यांच्या बोलण्यात ताळमेळ नव्हता. अकोल्यातील सभेत त्यांनी सांगितले की, अमली पदार्थांच्या पैशांतून काँग्रेस निवडणूक लढवत आहे. दिल्लीत हजारो कोटींचे अमली पदार्थ पकडण्यात आले. त्या प्रकरणी मुख्य आरोपी काँग्रेसचा एक नेता आहे. युवा वर्गाला व्यसनाच्या नादी लावून आलेल्या पैशांमधून काँग्रेसला निवडणुका लढवायच्या आहेत. पंतप्रधान मोदी यांचे हे वक्तव्य गंभीर आहे व या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास व्हायलाच हवा. पंतप्रधानांना देशातील युवकांच्या व्यसनाधीनतेची चिंता आहे हे ऐकून बरे वाटले, पण तरुण वैफल्यग्रस्त होऊन व्यसनाधीन का बनत आहे? याचे उत्तरही पंतप्रधानांनी द्यायला हवे. तरुणांच्या हाताला काम नाही. पदवीधरांना नोकऱ्या नाहीत. पदवीधरांनी रस्त्यावर पकोडे तळावेत असे स्वतः पंतप्रधान सांगतात. नोकऱ्या देण्याऐवजी त्यांना धर्मांध अफूची नशा पाजून माथेफिरू बनवले जाते व हीच मुले व्यसनाधीन होऊन आपल्या आयुष्याचे वाटोळे करून घेतात. मोदी काळात हे सर्व मोठ्या प्रमाणात घडले. मोदी यांनी दिल्लीत पकडलेल्या अमली पदार्थांचा काँग्रेसशी संबंध जोडला, पण मोदी-शहांच्या गुजरातमधील

मुंद्रा पोर्टवर

गेल्या पाच वर्षांत आठ ते दहा वेळा तीन लाख कोटींचे अमली पदार्थ पकडले गेले. हा साठा अफगाणिस्तानसारख्या देशातून आला. जेथे मोदी-शहांचे तटबंदी असलेले राज्य आहे, त्या बंदरावर केंद्राची सुरक्षा व्यवस्था आहे. तेथे वारंवार लाखो कोटींचे अमली पदार्थ उतरवले जातात. हे कसे घडते? या मुंद्रा बंदराचे मालक दुसरे तिसरे कोणी नसून मोदी-शहांचे लाडके गौतमभाई अदानी आहेत. तीन लाख कोटींचे अमली पदार्थ पकडले. याचा अर्थ ही धूळफेक असून याआधी शंभर लाख कोटींचे अमली पदार्थ उतरून ते देशभरात पसरले. या पैशांतून भाजप निवडणुका लढवत आहे असे आता म्हणायचे काय? नियम व कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच आहे. गुजरात हे अमली पदार्थांच्या सेवनाचे व व्यापाराचे सगळ्यात मोठे ‘हब’ बनले आहे आणि तेथे मोदी-शहांची पोलादी राजवट आहे. महाराष्ट्रात ललित पाटील प्रकरण गाजले. या ललित पाटीलशी ‘मिंधे-फडणवीस’ मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा थेट संबंध आहे. ललित पाटीलला ससून इस्पितळातून पळून जाण्यासाठी या मंत्र्यांची मदत होती. महाराष्ट्राचे मोदीपुरस्कृत सरकार ‘ड्रग्ज’च्या पैशांनी बरबटले आहे व मोदी-शहा या सरकारचे संरक्षक कवच बनले आहेत, पण पंतप्रधान मोदी दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान शिकवत आहेत. मोदी काल पोहरादेवीत होते. त्या व्यासपीठावर मिंधे सरकारमधील एक मंत्री संजय राठोड मोदींच्या चरणाशी बसले होते. या महाशयांवर खून, विनयभंग, बळजबरी असे आरोप पूजा चव्हाण या तरुणीने केले व एक दिवस तिने आत्महत्या केली. ही नक्की हत्या की आत्महत्या, हे रहस्य आहे. देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांनी त्या वेळी या राठोडना

फासावर लटकवण्याचीच भाषा

केली होती. राठोड यांचे त्या तरुणीकडे जाणे-येणे होते, असे आरोपही तेव्हा झाले होते. त्या महिलेच्या घरात नशेचे अनेक साहित्य मिळाले व तेच महाशय मंत्री म्हणून काल मोदींच्या चरणाशी बसले. यास ढोंग नाही तर काय म्हणायचे? हरयाणा निवडणुकीच्या प्रचारात मदत व्हावी म्हणून मोदी सरकारने महात्मा राम रहिम यास तुरुंगातून खास सुट्टी दिली. राम रहिमवर खून, बलात्कार, धमक्या असे आरोप आहेत. त्याच्या आश्रमांवर धाडी पडल्या, त्यात नशेचे सामान मोठ्या प्रकरणात सापडले, पण या महात्म्यास आतापर्यंत ‘भाजप’ मेहेरबानीने वारंवार मोठी ‘सुट्टी’ देण्यात आली. हरयाणाच्या निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे आवाहन महात्मा राम रहिमने केले. त्यावर मोदी यांचे काय म्हणणे आहे? मोदी यांना मागचे आठवत नाही व पुढचे दिसत नाही. लाडकी बहीण योजनेवर झारखंडला जाऊन टीका करायची व महाराष्ट्रात येऊन त्याच राजकीय योजनेचे कौतुक करायचे. पंतप्रधानपदावरील माणसाला असे वागणे व बोलणे शोभत नाही. मोदींना भाषणे लिहून देणाऱ्यांनी हे पथ्य पाळायला हवे. अंधभक्तांना टाळ्या वाजवायला काय जाते? पण पंतप्रधानांचे हसे होते. अमली पदार्थांबाबत मोदींची विधाने ही अशीच हास्यास्पद ठरली आहेत. नोटाबंदी केल्यावर अमली पदार्थांची तस्करी थांबेल, असे मोदी म्हणाले होते. उलट ती तस्करी जास्तच वाढली आहे. नोटाबंदीचा निर्णय ज्या कोणी मोदींना घ्यायला लावला ते एकतर गांजा किंवा चिलमीच्या नशेत असावेत, नाहीतर तरुणांना व्यसनाधीनतेच्या जाळ्यात ढकलणारा हा निर्णय झालाच नसता. मोदींचे वागणे, बोलणे आणि त्यांची भाषणे सध्या चेष्टेचा विषय बनली आहेत. महाराष्ट्रातील त्यांच्या दौऱ्यातील भाषणांबाबतही तेच घडले. त्यामुळे मोदी शुद्धीत आहेत ना? असा प्रश्न पडतो.