गिर्यारोहणासाठी गेलेल्या परदेशी महिला चौखंबा शिखरावर अडकल्या, तीन दिवसांनी हवाई दलाकडून सुटका

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात गिर्यारोहणासाठी गेलेल्या दोन परदेशी महिला चौखंबा शिखरावर अडकल्या. अखेर तीन दिवसांनी रविवारी सकाळी हवाई दलाकडून महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली. चमोलीचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राने ही माहिती दिली.

अमेरिकेची मिशेल थेरेसा ड्वोराक आणि युनायटेड किंगडमची फॅव्ह जेन मॅनर्स या महिला चमोली जिल्ह्यातील चौखंबा III शिखरावर गिर्यारोहणासाठी गेल्या होत्या. इंडिया माउंटेनियरिंग फाउंडेशन या संस्थेने परदेशी गिर्यारोहण मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेत परदेशी नागरिकांनी सहभाग नोंदवला. या मोहिमेअंतर्गत लॉजिस्टिक आणि तांत्रिक उपकरणे बंद पडल्याने 6,015 मीटर उंचीवर या दोन परदेशी महिला शिखरावर अडकून पडल्या.

हिंदुस्थानी हवाई दलाने दोन हेलिकॉप्टरद्वारे शुक्रवारी महिलांची शोधमोहीम सुरू केली. गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतलेले राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारीही शनिवारी या शोधमोहिमेत सामील झाले होते. अखेर रविवारी सकाळी या महिलांची सुखरुप सुटका करण्यात आली.