लातूरमध्ये हॉस्टेलमधल्या जेवणामुळे 50 विद्यार्थिनींना विषबाधा, रुग्णालयात दाखल

लातूरमध्ये हॉस्टेलमध्ये जेवल्यानंतर 50 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. सर्व विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल केले असून सर्वांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

लातूरच्या पुरनमल लाहोटी सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एकूण 324 विद्यार्थिनी शिकतात. शनिवारी रात्री सातच्या सुमारास विद्यार्थिनी हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये जेवायला आल्या. जेवणात डाळ, भात, चपाती आणि भेंडीची भाजी होती. पण साडे आठच्या सुमारास अनेक विद्यार्थिनींची तब्येत बिघडली. या विद्यार्थिनींना आधी मळमळ सुरू झाली नंतर उलट्या झाल्या. त्यानंतर सर्व विद्यार्थिनींना विलासवार देशमुख रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल 50 विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पहाटे तीनच्या 20 विद्यार्थीनींना हॉस्टेलमध्ये सोडण्यात आले.तर 30 विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. यात कुणाचीही प्रकृती गंभीर नव्हती अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.