निवडणूक जिंकण्यासाठी मोदी शहांचा गरबा, गडकरींचा ‘दांडी’या

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात आले होते. यावेळी त्यांनी विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते. पण विदर्भात कार्यक्रम असूनही केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात दांडी मारण्याची गडकरींची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात गडकरी गैरहजर होते.

2014 साली नागपूर लोकसभेतून गडकरी खासदार म्हणून निवडून येत आहेत. गडकरी यांनी भाजपचे अध्यक्षपदी भुषवले असून विदर्भातले ते बडे नेते समजले जातात. असे असताना गडकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. गेल्या महिन्यात वर्ध्यातच पंतप्रधान मोदी यांची सभा झाली होती. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी महिला उद्योजकांचा सन्मान केला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसही उपस्थित होते. 24 सप्टेंबरला नागपुरात कार्यक्रम होता. तेव्हाही गडकरी या कार्यक्रमाला हजर नव्हते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गडकरी बैठक घेत होते असे कारण नंतर समोर आले.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार राज्यातील आगामी निवडणुकीसाठी नितीन गडकरींना प्रत्येक निर्णयात समाविष्ट करण्याचे आदेश संघाने भाजपला दिले आहेत. विदर्भात निवडणूक लढवण्याबाबत, उमेदवार ठरवण्याबाबत आणि निवडणुकीत रणनीती ठरवण्याबाबत गडकरींना समाविष्ट करण्याचे निर्देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिले आहेत. या निर्णय प्रक्रियेत गडकरींसोबत देवेंद्र फडणवीस आणि संघाचे सहसचिव उतुल लिमये यांनाही निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले होते.