सध्या देशभरात सण उत्सवाचे वातावरण असून नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. देवीच्या सार्वजनिक मंडळात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. येथील शाहदरा भागात नवरात्रीच्या निमित्ताने रामलीलाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रभू रामाची भूमीका साकारणाऱ्या एका कलाकराचा कार्यक्रमादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
सुशील कौशिक असे त्या कलाकाराचे नाव असून तो दिल्लीतील विश्वकर्मा नगर परिसरातील रहिवाशी होता. सुशील हा व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर होता. मात्र त्याला अभिनयाची आवड असल्य़ामुळे तो नाटकात काम करायचा. दरम्यान शाहदरा भागात नवरात्रीनिमित्त रामलीला नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुशीलने प्रभु रामाची भूमीका साकारली होती. यावेळी तो संवाद बोलत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले आणि तो स्टेजवर कोसळला.
सुशीलची अवस्था पाहून त्याच्या साथीदारांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषीत केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे त्याच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेत एका उत्कृष्ट कलाकाराच्या निधनामुळे कलाप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.